आंबा मोहोरावर पडलीय उंटअळीची धाड

Mango Buds

रत्नागिरी /प्रतिनिधी : थंडीला सुरुवात होऊन आंबा कलमे मोहरतायत तोवर त्यावर उंटअळीची धाड पडली आहे. पावस पंचक्रोशीतील आंबा बागांमध्ये उंटअळीचा सर्वाधिक प्रादुर्भाव असून रत्नागिरी जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी हा त्रास जाणवू लागला आहे. ही अळी मोहोरावरील फुलोरा खाऊन टाकते व केवळ काड्या शिल्लक ठेवते. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या भाट्ये संशोधन केंद्राने तात्काळ या किडीचे संशोधन केले असता, ही उंटअळी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

यंदा वातावरणातील बदलांमुळे हंगाम लांबल्याने मोहरावर कीड, बुरशी, तुडतुडे पडण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर होता. तो टाळण्यासाठी, मोहराचे संरक्षण करण्यासाठी एकाच प्रकारचे कीटकनाशक दोन वेळा वापरल्याने उंटअळीचा प्रादुर्भाव झाला असल्याचा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे. ही अळी मोहोराचा फुलोराच खाऊन टाकत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. यावर्षी थंडी उशीरा सुरू झाली असल्याने मोहोर देखील उशीरा आला आहे. त्यामुळे यावर्षीचा आंबा हंगाम नियमित हंगामापेक्षा एक दीड महिना उशीरा होणार आहे.

यावर्षी आंबा बाजारात यायला मे महिना उजाडणार आहे. उंटअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. फुलोरा झालेल्या बागेत उंटअळीचा प्रादुर्भाव झाल्यास एकाच रात्री फुलोऱ्याचा फडशा पाडून केवळ काड्या शिल्लक रहात असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. अशा प्रकारच्या कीडीचा प्रादुर्भाव आढळल्यास मोनोक्रोटोफास किंवा क्लोरोपायरीफॉस सारख्या कीटकनाशकाची फवारणी करावी, असा सल्ला भाट्ये संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी दिला आहे.