मंगळवेढा- पंढरपूर हायहोल्टेज लढत, नेते पावसात भिजले पण मतदार संघात पाणी कधी येणार?

Ajit Pawar - Devendra Fadnavis - Maharastra Today
Ajit Pawar - Devendra Fadnavis - Maharastra Today

मंगळवेढा- पंढरपूर निवडणूकीकडं सर्व महाराष्ट्राचं लक्ष्य लागलंय. राष्ट्रवादीविरुद्ध भाजप असा सामना रंगला असताना दोन्ही पक्ष त्यांची संपुर्ण ताकद पणाला लावत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर झालेल्या एकापाठोपाठ एक गंभीर आरोपानंतर ही निवडणूक महाविकास आघाडी सरकारबद्दल जनतेच्या मनात नेमकी काय भावना आहे? याची लिटमस टेस्ट असल्याचं बोललं जातंय.

अजित पवार उद्विग्न

मंगळवेढा पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचा कोरोनामुळं मृत्यू झाला. निवडणूक आयोगानं या विधानसभा क्षेत्रात पोट निवडणूकीची घोषणा केली. दोन्ही पक्षांकडून बराच वेळ विचारविनिमय केल्यानंतर उमेदवार घोषित करण्यात आले. भारत भालके यांचे चिरंजीव भगिरथ भालके राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरलेत. तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आलीये. या निवडणूकीत अजित पवारांनी चांगलाच पुढाकार घेतलाय. गावोगावी फिरुन त्यांनी कार्यकर्त्यांचा सभा घेणं, मतदारांना पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न सुरु केला.

प्रचारा दरमान्य, दिवगंत भारत भालके हे ज्या ज्या गावांमध्ये पिछाडीवर होते. तिसऱ्या क्रमांकावर होते त्या गावात सभा घेताना त्यांनी मतदारांना दम दिल्याचं पहायला मिळालं.

यावेळी अजित पवार म्हणाले, “पूर्ण राज्याचा वाढपी मी आहे त्यामुळे कोणाच्या ताटात किती वाढायचं हे माझ्या हातात आहे अस सांगितलं.. तुमच्या गावाला येणार रस्ता एकदम बाद आहे.. भगिरथला लीड दया गावचा रस्ता एकदम स्टार रोड बनवून देतो.. गावचा रस्ता चांगला पाहिजे असेल तर २०१९ ला भालके यांना तीन नंबरला ठेवण्याची जी चूक तुम्ही केली ती करू नका.” असं आवाहनवजा दम उपमुख्यमंत्री अजित पवार लक्ष्मी दहिवड गावातील लोकांना दिल्याचं बोललं जातंय.

जर लीड दिल्यावरच यांचा आमदार गावचा विकास करणार असेल तर मग लक्ष्मी दहिवडीतुन ज्या ८३० लोकांनी भालके यांना गेल्यावेळी मतदान केले होते, ज्यांनी भलके यांच्यावर विश्वास टाकला त्यांना सुद्धा विकासापासून वंचीत ठेवण्याच पाप अजित पवार करतील का? असा प्रश्न जनसामान्य विचारत आहेत.

रेमडीसीवर इंजेक्शनामुळं पेटलं राजकारण

सध्या राज्यात कोरोनाची मोठी लाट आहे. मागच्या लाटेत पुण्या, मुंबईनंतर सर्वाधिक रुग्ण सोलापूरात आढळले होते. तिथली परिस्थीती कधीही हाताबाहेर जाऊ शकते. त्यात निवडणूका जाहिर झाल्यानं चिंता व्यक्त केली जातीये.

कोरोनावर उपचार करताना सर्वाधिक गरज ही ‘रेमडीसीवर’ इंजेक्शनाची असते. राज्यात या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचं चित्र आहे. अशातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पुढाकरा घेत रेमडीसीवर इंजेक्शनचे वाटप केलं. पण डॉक्टर अथवा शासकिय रुग्णालयांना इंजेक्शन न देता राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना इंजेक्शन दिल्यामुळं सोलापूरात वातारवण पेटलं. पंढरपूर मंगळवेढा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हातात रिकामे खोकडे ठेऊन सोलापूर जिल्ह्यासाठी इंजेक्शनचे वाटप करण्याचा स्टंट केला का ? असा सवाल भाजपच्या कार्यकर्त्यांनी उपस्थीत केला.

देवेंद्र फडणवीसांना आनंद शिंदेंच प्रतिउत्तर

“मंगळवेढा- पंढरपूर विधानसभेत तुम्ही राष्ट्रवादीचा कार्यक्रम करा, राज्यात महाविकास आघाडीचा कार्यक्रम मी करतो” असं विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणवीस यांनी मंगळवेढा- पंढरपूर पोट निवडणूकीच्या पोटनिवडणूकीत भाषण करताना केलं. यावर लोकगीत गायक आनंद शिंदेंनी त्यांच्या शैलीत प्रतिक्रिया दिलिये. “हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय” असा इशारा आनंद शिंदेंनी दिला. मित्र भारत भालके यांच्या प्रेमाखातर आनंद शिंदे हे त्यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी सोमवारी मंगळवेढ्यात आले होते.

राज्यपालांनी आडवून धरलेल्या १२ विधानपरिषद आमदारांच्या यादीत आनंद शिंदे यांच नाव आहे. त्यामुळं पक्षाच्या प्रचारासाठी आनंद शिंदे तिथे आले होते. आनंद शिंदे हे मूळचे मंगळवेढ्याचे आहेत. त्यांचे आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे मंगळवेढा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून तिकीट मिळालेल्या भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी आनंद शिंदेंनी मंगळवेढ्यात हजेरी लावली असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी त्यांनी स्वर्गीय भारत भालके यांच्या आठवणींना उजाळा देताना भगीरथ भालके यांना निवडून आणण्याचे आवाहन शिंदेंनी केले.

साडेतीन वर्षात दुष्काळ नाहीसा करण्याचा फडणवीसांचा दावा

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार आणि पालकमंत्री दत्ता भारणे यांच्या तुफान सभा गेल्या आठवड्याभरापासून या विधानसभाक्षेत्रात सुरु होत्या. फडणवीसांच्या सभा होत नसल्यामुळं देवेंद्र फडणवीसांचा भालकेंना पाठिंबा आहे का? असा प्रश्न विचारला जात होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून फडणवीसांनी मंगळवेढा- पंढरपूर विधानसभा क्षेत्रात बैठकांचा सपाटा लावलाय.

‘राज्यात सत्तेत आलेलं सरकार हे आधी होते महाविकास आघाडी…एका वर्षांत झालं ते महाविनाश आघाडी आणि आता ते ओळखलं जातंय महावसुली आघाडी. म्हणून मंगळवेढा – पंढरपूरच्या जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवावी’, असं आवाहन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभेत केलं होतं.

या निवडणुकीत फडणवीस यांनी आघाडी सरकारवर घणाघात करताना या सरकारमुळे ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थातील आरक्षण रद्द झाल्याचे सांगत सर्वोच्य न्यायालयाने मागणी करूनही यांनी कमिशन न नेमल्याने आता या उत्तरं मागासवर्गीय समाजाचा आरक्षणावर निवडणूक लढविण्याचा अधिकार गमवावा लागल्याची टीका केली . मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांच्या पाणी प्रश्नावर गेल्या तीन निवडणूक यांनी जिंकल्या पण पाण्याचा थेंबही आला नाही असे सांगत आता केंद्राकडून निधी आणून येत्या साडेतीन वर्षात या ३५ गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा विश्वास फडणवीस यांनी दिला.

राष्ट्रवादीच्या भारत भालकेंना सहानभूतीचा फायदा मिळतो की पाणीप्रश्न सोडवण्याच्या आश्वासानावर समाधान आवताडेंच्या गळ्यात विजयमाला टाकेल. याचं उत्तर निवडणूकीच्या निकालानंतरच मिळेल एवढं मात्र नक्की.

Disclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button