राहुल गांधी वायनाडचे खासदार, केरळमधील हत्तीणीच्या मृत्यूप्रकरणी अद्याप कारवाई का नाही?

Maneka Gandhi on Rahul Gandhi

नवी दिल्ली :- केरळमध्ये गर्भार हत्तीणीचा नाहक बळी गेल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. देशभरातून हत्तीणीच्या अशा मृत्युसाठी संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यातच भाजप खासदार मेनका गांधी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना यासाठी जाब विचारला आहे. “राहुल गांधी वायनाडचे खासदार आहेत, त्यांनी कारवाई का केली नाही?’ असा प्रश्न मेनका गांधी यांनी उपस्थित केला आहे.

ही बातमी पण वाचा : अमानवीय कृत्यामुळे निष्पाप गरोदर हत्तीणीचा मृत्यू

“केरळमध्ये दर तिसर्‍या दिवशी एका हत्तीचा मृत्यू होतो. विशेषत: मलप्पुरम जिल्हा, केवळ प्राणीच नाही तर माणसांवर होणाऱ्या हल्ल्यांसाठीही कुख्यात आहे. असे मेनका यांनी म्हटले आहे. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी त्याच भागातील आहेत, त्यांनी अद्याप या प्रकरणावर कारवाई का केली नाही?’ असा प्रश्न मेनका गांधी यांनी विचारला आहे.

त्या म्हणाल्या, ‘मलप्पुरम हा असा जिल्हा आहे, जिथे कदाचित सर्वाधिक हिंसाचार होतो. मलप्पुरममध्ये दररोज अशी एखादी घटना घडते. ते केवळ हत्तींनाच ठार मारत नाहीत, तर विष टाकून हजारो प्राण्यांचे एकत्र जीव घेतात. पक्षी, कुत्रे दररोज गतप्राण होतात’ असं मेनका गांधी यांनी सांगितलं.

त्याचप्रमाणे केरळ सरकारवरही मेनका गांधी यांनी गंभीर आरोप केले आहे. “मलप्पुरममध्ये कोणतीही कारवाई करण्यास पिनराई विजयन सरकार घाबरत आहे. कोणाचाही जीव घ्या, सरकार कोणतीही कारवाई करणार नाही, यासाठी केरळची ख्याती वाढली आहे. वन सचिव आशा थॉमस, मुख्य वन्यजीव वॉर्डन सुरेंद्रन आणि पर्यावरण मंत्री के. राजू यांच्याशी बोलून बोलून वैतागले मात्र, काहीही सुधारणा नाही. तसेच हत्तीणीचे हे पहिले प्रकरण नाही. तीन-पाच दिवसांत एखादा हत्ती मारला जात आहे.” असा दावाही मेनका गांधी यांनी केला.

काय घडले नेमके –

केरळमध्ये गर्भार हत्तीणीला काही समाजकंटकांनी फटाके भरलेलं अननस खाऊ घातलं. अननसातील फटाके हत्तीणीच्या तोंडात फुटल्याने तिला गंभीर इजा झाली होती. त्यानंतरही कुठलाही आकांडतांडव न करता हत्तीण शांतपणे नदीच्या पाण्यात जाऊन उभी राहिली. तिला बाहेर काढण्याचे अतोनात प्रयत्न करण्यात आले, मात्र ती निश्चल राहिली. अखेर तीन दिवसांनी तिने प्राण सोडले. त्यावेळी ती गर्भार असल्याचं समोर आलं. हत्तीण 14 ते 15 वर्षांची असल्याचा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER