प्राचीन गोकर्ण महाबळेश्वर मंदिराचे व्यवस्थापन न्या.श्रीकृष्ण समितीकडे

Justice BN Srikrishna - Mahabaleshwar Temple Gokarna

नवी दिल्ली : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या कर्नाटकातील कारवारजवळील गोकर्ण महाबळेश्वरच्या प्राचीन मंदिराचे (Gokarna Mahabaleshwar Temple) व्यवस्थापन निवृत्त न्यायाधीश न्या. बी. एन. श्रीकृष्ण (B. N. Srikrishna) यांच्या अध्यक्षतेखालील एका निगराणी समितीकडे सोपविण्याचा सुधारित अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला.

सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे, न्या. ए.एस. बोपण्णा व न्या. व्ही. रामसुब्रम्हण्यन यांच्या खंडपीठाने आधी दिलेल्या अंतरिम आदेशांमध्ये सुधारणा करून हा नवा आदेश दिला. त्यानुसार दक्षिण  काशी म्हणून ओळखल्या जाणाºया या १,७०० वर्षे जुन्या मंदिराचे व्यवस्थापन आदि  शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या रामचंद्रपूर मठाकडून न्या. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखालील निगराणी समितीकडे हस्तांतरित होईल. न्या. श्रीकृष्ण मुळचे कर्नाटकचे असून ते स्वत: संस्कृत व हिंदू धर्मशास्त्राचे प्रकांड पंडित आहेत.

आधी या मंदिराचे व्यवस्थापन कर्नाटक सरकारच्या हिंदू धार्मिक व धर्मादाय संस्था कायद्यानुसार सरकारनियुक्त समितीकडे होते. परंतु ऑगस्ट, २००८ मध्ये कर्नाटक सरकारने गोकर्ण महाबळेश्वर मंदिर त्या कायद्याच्या कक्षेतून वगळले. त्यानंतर मंदिराचे व्यवस्थापन रामचंद्रपूर मठाकडे आले. त्यास कर्नाटक उच्च न्यायालयात आव्हान दिले गेले. उच्च न्यायालयाने ऑगस्ट , २०१८ मध्ये राज्य सरकारचा निर्णय रद्द केला व मंदिराच्या व्यवस्थापनावर देखरेख ठेवण्यासाठी उत्तर कन्नडा जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. न्या. श्रीकृष्ण यांना या समितीचे सल्लागार नेमले गेले होते.

उच्च न्यायालयाच्या या निकालाविरुद्धचे अपील सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यात आता दिलेल्या नव्या अंतरिम आदेशानुसार मंदिराच्या व्यवस्थापनासाठी नेमलेल्या निगराणी समितीचे अध्यक्ष न्या. श्रीकृष्ण यांना करण्यात आले आहे.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button