अजित पवार असल्याचे भासवून प्रॉपर्टी प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्या युवकाला अटक

Ajit Pawar

मुंबई : पुणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या शब्दाला किंमत आहे. बारामती (baramati) मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असले तरी अजित पवार यांची पुण्यावर बारीक नजर असते. सध्या ते पुण्याचे पालकमंत्रीदेखील आहेत. या सर्व परिस्थितीचा फायदा अजित पवार असल्याचे भासवून एका प्रॉपर्टी (Property) प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्या २५ वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक केली आहे.

माहितीनुसार, एका कुटुंबाला फोनवर अजित पवार असल्याचे सांगून त्यांच्यात सुरू असलेला प्रॉपर्टी वाद मिटवण्याचा सल्ला या आरोपीने दिला होता. पुण्याच्या दौंड तालुक्यातील खडकी गावातील एका कुटुंबात प्रॉपर्टीवरून वाद सुरू होता. एका  सुनेला आपली वडिलोपार्जित मालमत्ता विकायची होती, तर दुसऱ्या सुनेचा मालमत्ता विकण्यास विरोध होता. अटक करण्यात आलेला आरोपी हा त्याच गावात राहणारा आहे.

त्याने २ सप्टेंबर रोजी संबंधित कुटुंबातील एका ज्येष्ठ व्यक्तीला फोन करून ही मालमत्ता विकण्यासाठी परवानगी द्यावी, अशी सूचना केली. मात्र या कुटुंबातील सदस्यांना हा बोगस कॉल असल्याची कुणकुण लागली आणि त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी तपासचक्र फिरवून आरोपीला अटक केल्यानंतर त्याने गुन्हा मान्य केला.

मला फक्त त्या कुटुंबाला मालमत्ता विकण्यासाठी घाबरवायचे होते, असे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंड विधान कलम १७० (सरकारी व्यक्ती असल्याचे भासवणे) आणि ५०७ (अज्ञात संभाषणाद्वारे धमकी देणे) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

ही बातमी पण वाचा : अजित पवारांचा हटके अंदाज ; पहाटे तिकीट काढून पुणे मेट्रोमध्ये केला प्रवास

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER