बहिणीसाठी गणेश ठरला देवदूत

भाऊजींना किडनी देऊन दिले जीवदान

कोल्हापूर :- बहीण आणि भावाने एकमेकांसाठी जीव गहाण ठेवत केलेल्या मदतीचे अनेक किस्से आहेत. पण बहिणीच्या सौभाग्याला बळ मिळावे, यासाठी कसबा बावड्यातील गणेश वावरे या तरुणाने भाऊजींना आपली किडनी दिली. गणेशने बहिणीला दिलेल्या या भाऊबीजेची कौतुकाने चर्चा सुरू आहे.

कोल्हापूर :शाहू महाराज समाधी स्मारक लोकार्पण सोहळयानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम

कसबा बावडा येथील धनगर गल्ली येथे राहणाऱ्या गणेश वावरे या तरुणाने बहिणीच्या नव-याला किडनी देऊन बहीण-भावाच्या प्रेमाला एक वेगळा आयाम दिला. गणेश यांची बहीण दीपाली यांचे पती दीपक ढंग हे पोलीस दलात फौजदार आहेत. फौजदार पदाची खात्यांतर्गत परीक्षा होण्यापूर्वीच दीपक यांच्या दोन्हीही किडन्या निकामी झाल्या. दरम्यान, पोलीस दलातूनच निवृत्त झालेले त्यांचे वडील रामचंद्र ढंग यांनी एक किडनी देऊन दीपक यांना जीवदान दिले. यानंतर जिद्दीने दीपक यांनी फौजदार होऊन वडिलांचा त्याग समर्पक ठरविला. मात्र, नियतीच्या मनात वेगळाच डाव होता. पुन्हा दीपक यांना किडनीचा त्रास जाणवू लागला. उपचार सुरू असताना वडिलांची बसवलेली किडनी निकामी झाल्याचे निदान पुढे आले. ढंग कुटुंबापुढे डोंगराएवढे संकट उभे राहिले. आता पुढे काय, असा भला मोठा प्रश्न होता.

दीपक यांच्यावर पुन्हा किडनी रोपणाची शस्त्रक्रिया करावी लागणार होती. पण किडनी कोण देणार? हा मोठा प्रश्न होता. बहिणीचे सौभाग्य वाचविण्यासाठी गणेश किडनी देण्यास एका क्षणात तयार झाला. वैद्यकीय चाचण्यांचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर ११ डिसेंबरला मुंबईतील खासगी रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. गणेश आणि दीपक या दोघांचीही प्रकृती आता उत्तम आहे. किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेनंतर आपले भाऊजी आणि बहिणीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून सार्थक झाल्याची प्रतिक्रिया गणेश यांनी दिली. बहिणीचा संसार उभा राहावा, त्यासाठी किडनी देणाऱ्या गणेशचे कौतुक होत आहे.