बंगाल बनले युद्धभूमी

Badgeआपल्याकडे निवडणूक ही नवी गोष्ट नाही. निवडणुका येतात आणि जातात; पण यंदा बंगालमधील निवडणुकांनी सारे विक्रम मोडले. बंगालसोबत काश्मीरमध्येही निवडणुका झाल्या; पण काश्मीरमध्ये झाला नाही त्याच्या हजारपट हिंसाचार बंगालमध्ये झाला. मतदानाच्या सहाही फेऱ्यांमध्ये हिंसाचार झाला. कोलकात्यात काल अमित शहा यांच्या रोड शोमध्ये झालेल्या राड्याने तर बंगालला युद्धभूमीचे स्वरूप आले. दगडफेक, जाळपोळ झाली. याचा अर्थ दंगलखोर पूर्ण तयारीने आले होते. सीआरपीएफच्या जवानांनी अमित शहा यांना उचलले नसते तर त्यांचे बरेवाईट झाले असते. कुणामध्ये आहे ही लढाई? काय हवे आहे त्यांना? ममता बॅनर्जी विरुद्ध नरेंद्र मोदी, भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस, हिंदुत्व विरुद्ध माँ, माटी, मानुष असे ह्या लढाईचे स्वरूप आहे.

ही बातमी पण वाचा : ममता बॅनर्जी मला पंतप्रधान मानत नाही : मोदी

बंगालच्या निवडणुकीला यंदा प्रथमच एवढे महत्त्व का आले? कारण ममता आणि मोदी यांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. ममता यांना पंतप्रधान व्हायचे आहे. त्यासाठी बंगालमधल्या सर्व ४२ जागा जिंकून पंतप्रधानपदावर आपलाच कसा
दावा बनतो ते मोदीविरोधकांना दाखवायचे आहे. मोदींची अडचण वेगळी आहे. उत्तर प्रदेशात यंदा भाजपच्या जागा कमी होताना दिसत आहेत. बंगालमध्ये जास्त जागा जिंकून मोदी ती तूट भरून काढू पाहात आहेत. त्यामुळे भाजपने सुरुवातीपासून बंगालमध्ये काम वाढवले होते. बंगाल हातचा जातोय हे पाहून बिथरलेल्या ममता यांनी सुरुवातीपासून आगीत तेल ओतले. ममता २५ पेक्षा अधिक वर्षांपासून राजकारणात असल्या तरी सनकी आहेत, भांडखोर आहेत.

ही बातमी पण वाचा :- अमित शाह देव नाही, गुंड आहेत! – ममता बॅनर्जी

मोदींना पंतप्रधान मानायला त्या तयार नाहीत, त्यांना थापड लगाऊ म्हणतात. ममता आणि मोदी यांचा हा कलगीतुरा गेल्या १५ दिवसांपासून देश पाहतो आहे. त्याचा काल स्फोट झाला. म्हणजे आणखी दोन दिवस प्रचाराची रणधुमाळी चालणार आहे. येत्या रविवारी बंगालमध्ये अखेरच्या उरलेल्या नऊ जागांसाठी मतदान आहे. मतदान म्हणजे युद्धच आहे. ह्या युद्धात कोण जिंकतो ते २३ मे रोजी कळेल.