विरोधी पक्षांच्या बैठकीला ग्रहण; मायावती, ममता, अखिलेश यांचा बैठकीसाठी नकार!

Mayawati,Mamta Banerjee,Akhilesh Yadav

लखनौ : लोकसभा निवडणुकीचे निकाल येत्या २३ मे रोजी लागणार आहेत. मात्र असे असले तरी विरोधी पक्षांकडून आतापासूनच सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी १९ मे रोजी होणारे शेवटच्या फेरीतील मतदान आणि २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीपूर्वी विरोधी पक्षांची एक बैठक आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र उत्तर प्रदेशमध्ये महाआघाडी करून निवडणूक लढवत असलेल्या मायावती, अखिलेश यादव आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष  ममता बॅनर्जी यांनी या बैठकीत उपस्थित राहण्यास नकार दिला.

ही बातमी पण वाचा : अमित शहानंतर आता योगी आदित्यनाथांवरही ममता दीदींनी घातली बंदी!

दरम्यान, सर्व नेत्यांची उपस्थिती निश्चित झाल्यानंतर ही बैठक २१ मे रोजी आयोजित होणार आहे. चंद्राबाबू नायडू यांनी या संदर्भात ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच त्यांनी राहुल गांधी यांच्याशीसुद्धा यासंदर्भात चर्चा केली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी अशा कुठल्याही बैठकीत सहभागी होण्यास ममता बॅनर्जी यांनी नकार दिला आहे.

तर दुसरीकडे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मायावती आणि अखिलेश यादव यांनीही निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी विरोधकांनी बोलावलेल्या अशा कुठल्याही बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरच या बैठकीबाबतचे चित्र स्पष्ट होऊ शकते, असे समाजवादी पक्षाने म्हटले आहे. त्यामुळेच दिल्लीत होणाऱ्या या बैठकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ही बातमी पण वाचा : एकटा भाजपच लोकसभेच्या ३०१ जागा काबीज करणार!