फ्लॅशबॅक : बोल्ड अभिनेत्री ते ड्रग माफियाच्या पत्नीपर्यंतचा प्रवास करणारी मराठमोळी ममता कुलकर्णी

Mamata Kulkarni

बॉलिवूडमध्ये मराठी नायिकांनी आपला ठसा उमटवला आहे. अगदी नूतन, तनुजापासून ते माधुरी, ऊर्मिला मातोंडकरपर्यंत. काही नायिकांनी आपला ठसा उमटवला तर काही नायिका कधी आल्या आणि गेल्या ते कळलेही नाही. ममता कुलकर्णीचे (Mamata Kulkarni) मात्र तसे नाही. ती आलीही दणक्यात, भरपूर चित्रपट करून नाव व पैसाही कमवला.परंतु आता एका ड्रग माफियाची पत्नी, अध्यात्माकडे वळलेली नायिका म्हणून तिची ओळख झाली आहे. एका बोल्ड अभिनेत्रीचा हा प्रवास  बॉलिवूडमध्ये  येऊ इच्छिणा-या मुलींना कसे वागू नये हे दाखवणारा आहे.

१९९२ मध्ये ‘हॉलीडे इन’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये एका चित्रपटाच्या निमित्ताने ममता कुलकर्णीची (Mamata Kulkarni) भेट झाली होती. तेव्हा फोटोग्राफीही करीत असल्याने ममताचे अनेक फोटोही काढले होते. मराठी मुलगी असल्याने तिच्याबाबत एक सॉफ्ट कॉर्नर होता. ममताही अन्य मराठी नायिकांप्रमाणे हिट व्हावी असे मनोमन वाटत होते. ममताशी मराठीत बोलण्यास सुरुवात केली  तेव्हा तिने जराही न लाजता मराठीत संवाद साधला होता. त्यानंतर ‘वादे-इरादे’ या चित्रपटाच्या वेळी ममताची पुन्हा भेट झाली होती. त्यावेळी नायिकांच्या अंगप्रदर्शनाबाबत विचारले असता ममताने सांगितले होते, अंगप्रदर्शन करून जर हिट होता आले असते तर आज अनेक नायिका क्रमांक एकवर असत्या. अंगप्रदर्शनापेक्षा मी अभिनयावर जास्त भर देते, असेही ममताने म्हटले होते.

mamata

तिच्या या वक्तव्याला काही दिवस होतात न होतात तोच एका इंग्रजी सिनेमासिकाच्या मुखपृष्ठावर ममताचा टॉपलेस फोटो प्रदर्शित झाला आणि एकच खळबळ माजली. अनेक नायिकांनी असा फोटो देण्यास नकार दिला होता; परंतु ममताने मात्र मराठीपणाचे धाडस दाखवत टॉपलेस फोटो शूट केले आणि तो फोटो छापलाही. त्यानंतर एका प्रख्यात मराठी वर्तमानपत्रात त्याबाबत लिहिले असता ममता खूप रागावली होती. मी लहान होते. मला काही कळत नव्हते. मी डेमी मूरचे फोटोसेशन पाहिले होते. त्याप्रमाणे फोटो सेशन करावे असे मला वाटले होते. मात्र त्यावरून इतके वादळ निर्माण होईल असे मला वाटले नव्हते. या फोटो सेशनपूर्वी ममताचे तिरंगा, वक्त हमारा है, आशिक आवारा, भूकंप चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्या लेखानंतर भेट झाली असता तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती असे तिने सुनावले होते. मात्र तिच्याकडे चित्रपटांची रांग लागली आणि तिचा रागही गेला. त्यानंतर अनेक वेळा ममताशी भेट झाली; पण तिच्या मनात कटुता नव्हती. १९९३ नंतर प्रत्येक वर्षी ममताचे तीन ते पाच चित्रपट प्रदर्शित व्हायचे. १९९५ मध्ये तर तिचे नऊ चित्रपट प्रदर्शित झाले होते. यावरून ममताला किती डिमांड होती ते स्पष्ट होते.

२० एप्रिल १९७२ ला एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या ममताने फार तर १८ व्या वर्षीच बॉलिवूडकडे पावले वळवली होती. ममताचा  बॉलिवूडमध्ये प्रवेश तिच्या आईमुळेच झाला. ममताची आई गाणी गात असे. ती लता मंगेशकर यांची फार मोठी प्रशंसक होती. केवळ आईमुळे मी चित्रपटात काम करण्याचा विचार केला. आई जेव्हा लता मंगेशकर यांना भेटली तेव्हा तिच्या जीवनातील तो ऐतिहासिक दिवस होता, असे ममताने सांगितले होते. कुलकर्णी कुटुंबात ममता तिसरी मुलगी होती. ममताचा जन्म झाला आणि निलंबित झालेल्या तिच्या वडिलांना पुन्हा नोकरी मिळाली. त्यांचे प्रमोशनही झाले होते. त्यामुळे ममता चांगल्या पायगुणाची मुलगी म्हणून तिचे फार लाड केले जात असत.

१९९२ मध्ये राजकुमार आणि नाना पाटेकर अभिनीत ‘तिरंगा’ चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली होती. त्यानंतर ममताने ‘मेरा दिल तेरे लिए’ चित्रपट केला. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही चालला नाही. त्यानंतर ममताला सैफ अली खानसोबत ‘आशिक आवारा’ चित्रपट मिळाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान लोकप्रिय झाला आणि ममताकडे चित्रपटांची रांग लागली.

मेहुलकुमारच्या नाना पाटेकर अभिनीत ‘क्रांती’वर आणि राकेश रोशन दिग्दर्शित शाहरुख आणि सलमान अभिनीत ‘करन अर्जुन’मुळे ममताचा ग्राफ चढताच राहिला. सलमान खान आणि ममता कुलकर्णीची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली होती. यानंतर आमिर खानसोबत ममताने ‘बाजी’ चित्रपट करून  बॉलिवूडमधील सर्व मोठ्या नायकांबरोबर काम करून एक अनोखा विक्रम केला. ‘सबसे बडा खिलाडी’मध्ये ती अक्षयकुमारचीही नायिका झाली. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी झाला होता. इतक्या कमी काळात  बॉलिवूडच्या सर्व सुपरस्टारबरोबर कोणत्याही नायिकेने काम केले नव्हते. आणि इतके हिट चित्रपटही दिले नव्हते. ममताच्या चित्रपटातील सर्व गाणीही हिट झालेली आहेत. राजकुमार संतोषी यांच्या ‘घातक’मध्ये ममताने पाहुणा कलाकार म्हणून भूमिका साकारली. तिच्यावर चित्रित केलेले ‘कोई जाए तो ले जाए’ गाणे आजही लोकप्रिय आहे. यानंतर ममताने आणखी काही चित्रपट केले; परंतु तिच्या जीवनात असे काही घडले ज्यामुळे ती  बॉलिवूड (Bollywood)  सोडून गायब झाली.

१२-१३ वर्षे बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर ममताने अध्यात्माकडे आपला मोहरा वळवला. ममताने गगनगिरी महाराजांना आपला गुरू मानले होते. मी जेव्हा गगनगिरी महाराजांकडे गेले तेव्हा माझ्या मनात खूप प्रश्न होते. परंतु तेथे गेल्यावर माझे मन शांत झाले, असे ती म्हणाली. ममताने आपल्या आध्यात्मिक जीवनावर पुस्तकही लिहिले आहे. विकीशी ममताची भेट योगायोगानेच झाली होती. ममता विकीच्या प्रेमात पडली आणि दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. २०१२ मध्ये विकी दुबईच्या तुरुंगात होता. तेव्हा ममता कुंभमेळ्यात गेली होती. आजही विकी विरोधात ड्रग्ज स्मगलिंगची केस सुरू आहे.

ममताचे आयुष्य अनेक चढ-उतारांनी भरलेले आहे. म्हणूनच कदाचित तिच्या जीवनावर चित्रपट काढण्याचा विचार काही निर्माते करू लागले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER