कुठल्याही राज्यात दिल्लीवाल्यांची दादागिरी चालणार नाही हे जखमी वाघिणीने दाखवले – संजय राऊत

Mamata Banerjee - Sanjay Raut

मुंबई :- पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेसने (Trinamool Congress) भाजपला (BJP) मोठा धक्का देत सरकार स्थापण्यासाठी बहुमत प्राप्त केले आहे. पश्चिम बंगालच्या या निकालावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, बंगालच्या विजयाची मशाल संपूर्ण देशात एक नवा प्रकाश निर्माण करेल. “एक स्त्री, एक जखमी वाघीण मैदानात उतरून एकटी लढत होती.  त्यांच्या पक्षाला उद्ध्वस्त केलं, नेत्यांना तोडलं, दबाव आणला, केंद्रीय यंत्रणांचा दवाब आणला. आपलेच लोक विरोधात उभे असतानाही बंगालची वाघीण मागे हटली नाही.  लढत राहिली आणि ऐतिहासिक विजय मिळवला आहे. दिल्लीवाल्यांची दादागिरी कोणत्याही राज्यात चालणार नाही हे दाखवून दिले. हा विजय संपूर्ण देश आणि राजकारणासाठी प्रेरणादायी आहे.” अशा शब्दांत संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांचं कौतुक केलं. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी राऊत म्हणाले की, निवडणुकीत विजय आणि पराभव हा होतच असतो. भाजपाने पश्चिम बंगालमध्ये खूप कष्ट घेतले. सर्वांना कामाला लावले, तरीही ममतादीदी सर्वांवर भारी पडल्या. ममता जमिनीशी जोडलेल्या असून आजही जनतेवर त्यांचा मोठा प्रभाव आहे हे दिसून आले. तुम्ही सभा घेतल्या, रॅली काढल्या, पैसा ओतला हे लोकांना दिसत आहे, तरीही लोकांनी पश्चिम बंगालची लेक म्हणून ममता बॅनर्जी यांच्याकडे सत्ता सोपवली आहे. हा लोकशाहीचा खूप मोठा विजय आहे.

या निवडणुकीत मोदी, अमित शहा (Amit Shah) आणि जे.  पी.  नड्डा यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. देशात कोरोनाचं संकट असतानाही प्रोटोकॉल तोडून रोड शो, रॅली, शक्तिप्रदर्शन करण्यात आले. सगळा देश कोरोनाशी दोन हात करत असताना तिथे भाजपा ममतांचा पराभव करण्यासाठी लढत होता. पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या बदल्यात तुम्ही देशाला कोरोना भेट दिला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

ममता बॅनर्जींनी पुन्हा एकदा दिल्लीतून येऊन कोणत्याही राज्यात दादागिरी सहन केली जाऊ शकत नाही हे दाखवून दिले आहे. मग ते महाराष्ट्र असो, दिल्ली असो किंवा मग पश्चिम बंगाल असो. तेथील जनता, प्रादेशिक पक्ष देशाचं राजकारण ठरवतो हा संदेश दिला आहे. प्रधानमंत्री मोदींनी कोरोनाची लढाई सोडून पश्चिम बंगालमध्ये व्यस्त राहणं योग्य नव्हतं असं मला वाटतं. पक्ष लढत असतो; पण जेव्हा पंतप्रधान उतरूनही पराभव होतो तेव्हा त्याचं खापर त्यांच्यावरच असतं. हे देशासाठी ठीक नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

महाराष्ट्राच्या राजकारणात कुठलीही उलथापालथ होणार नाही. पश्चिम बंगालमध्ये भाजपा बहुमताने निवडून येईल आणि महाराष्ट्रात राजकीय भूकंप येईल, असा दावा केला जात होता. पण तसं झालेलं नाही. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र भावनेने एकमेकांशी जोडलेले आहेत. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र नेहमी राष्ट्रहितासाठी लढले आहेत. यापुढेही आम्ही सोबत राहणार आहोत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही ममता बॅनर्जींच्या विजयावर आनंद व्यक्त केला आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button