शरद पवारांच्या एका पत्रामुळे ममतादीदींना मिळाले बळ, प्रचारालाही जाणार

Sharad Pawar-Mamata Banerajee

मुंबई :- पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीसाठी आठ टप्प्यांमध्ये मतदान होत असून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचा विरोध नाकारून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना पाठिंब्याचे पत्र पाठवलं आहे. यामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात ममता बॅनर्जींच्या (Mamata Banerajee) प्रचार अभियानात जोर वाढला आहे. तसेच शरद पवार शेवटच्या टप्प्यात ममतांच्या प्रचारासाठी बंगालच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहितीही पक्षाकडून देण्यात आली आहे.

भाजपचा विजय रथ रोखण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी देशातील प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रमुखांना पत्र लिहून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत देशातील बहुतांश राजकीय पक्षांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे. काही राजकीय पक्ष तर थेट ममता बॅनर्जी यांच्या प्रचारासाठी पश्चिम बंगालच्या रंगणात उतरले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकत्रितपणे लढाई लढावी, असं आवाहन ममता बॅनर्जी यांनी केलं होतं. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसची होणारी पीछेहाट बघता सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपविरोत एकत्र यावे, असं आवाहन करण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर ‘निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला पवारसाहेब जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

आमच्या पक्षाचा ममताजींना पाठिंबा आहे. ‘शरद पवारसाहेबांचा १ ते ३ एप्रिल असा पश्चिम बंगालचा दौरा होता. परंतु त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना जाता येणार नाही. मात्र पवारसाहेबांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाल्यास शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला पश्चिम बंगालला जातील,’ असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख तेजस्वी यादव हे देखील ममता बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ प्रचारात उतरले आहे. भाजपला कुठल्याही परिस्थितीत धूळ चाटवण्याचा ममता बॅनर्जी यांनी प्रण घेतला आहे. त्यामुळे निवडणूक निकालात नेमकं काय होतं, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांच्या प्रकृतीविषयी विकृत फेसबुक पोस्ट; राष्ट्रवादीची तक्रार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button