ममतादीदींनी जनतेचा विश्वासघात केला; मोदींचा ‘तृणमूल’वर हल्ला

Mamata Banerjee - PM Narendra Modi

कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पश्चिम बंगालच्या दौर्‍यावर असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि तृणमूल काँग्रेसवर (Trinamool Congress) हल्लाबोल केला. बंगालने परिवर्तनासाठीच ममतादीदींवर विश्वास ठेवला. पण, दीदी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विश्वासघात केला. मुलींवर अत्याचार केले, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी बॅनर्जी सरकारवर टीकास्त्र सोडले.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा कोलकातातील ब्रिगेड मैदानावर पार पडली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेससह डावे पक्ष आणि काँग्रेसवर निशाणा साधला. पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले. मोदी म्हणाले की, “बंगालमध्ये जन्म घेतलेल्या महान व्यक्तींनी एक भारत, श्रेष्ठ भारत ही भावना बळकट केली. बंगालच्या याच भूमीने एक संविधान, एक निशाण, एक पंतप्रधान यासाठी बलिदान देणारा पुत्र दिला. अशा पवित्र भूमीला मी नमन करतो. या भूमीने संस्काराची ऊर्जा दिली. या भूमीने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात प्राण फुंकले. बंगालच्या या भूमीने ज्ञान आणि विज्ञानाच्या क्षेत्रात भारताची मान उंचावली. याच बंगालला ममता बॅनर्जी यांनी धोका दिला.

त्यांच्या कार्यकर्त्यांनी बंगालचा विश्वासघात केला. या लोकांनी बंगालला अपमानित केले. बहिणी आणि मुलींवर अत्याचार केले. विधानसभा निवडणुकीत एका बाजूला तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष त्यांची बंगालविरोधी वागणूक आहे. तर दुसऱ्या बाजूला बंगालची जनता पाय रोवून उभी आहे. ब्रिगेड मैदानावरील जनतेचा आवाज ऐकल्यानंतर कोणालाही शंका राहणार नाही.” असे मोदी म्हणाले.

“या ब्रिगेड मैदानावरून तुम्हाला आशोल पोरिबोरतोची ग्वाही देण्यासाठी आलो आहे. तुम्हाला विश्वास देण्यासाठी आलो आहे. विश्वास बंगालच्या विकासाचा, बंगालमधील परिस्थिती बदलण्याचा, बंगालमध्ये गुंतवणूक वाढवण्याचा, बंगालचे पुनर्निर्माण करण्याचा, विश्वास बंगालच्या संस्कृती रक्षणाचा. इथल्या तरुणांसाठी मी ग्वाही देतो. इथल्या विकासासाठी २४ तास काम करू. कष्ट करण्यात कोणतीही कुचराई होणार नाही.” असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER