जनमत सर्वेक्षणाचा निष्कर्ष : पश्चिम बंगालमध्ये ममतादीदींची जादू आजही कायम

Mamata Banerjee

कोलकाता : काही दिवसांतच होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘टीव्ही-९ भारतवर्ष’ने केलेल्या जनमत सर्वेक्षणात सर्वांत मोठे ओपिनियन पोल जाहीर केले आहे. या पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची जादू आजही कायम आहे. तर दुसऱ्या नंबरवर मोदी लाट दिसून येत आहे. मुख्यमंत्री म्हणून बंगाली जनतेने पुन्हा एकदा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनाच सर्वाधिक पसंती दिली आहे. तर, माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनाही मुख्यमंत्री म्हणून बंगाली जनतेने पसंती दिली आहे.

१० हजार मतदारांचा हा सर्व्हे केला गेला. विविध प्रश्नांवर त्यांची मते जाणून घेण्यात आलीत. १२ ते १५ मार्च दरम्यान हे पोल घेण्यात आले असून ममता बॅनर्जी यांनाच मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती असल्याचं स्पष्ट झालं आहे. यावेळी राज्यातील गेमचेंजर मुद्दा कोणता राहील? नंदीग्राममध्ये कोण जिंकणार? ममता बॅनर्जींवर निवडणुकी दरम्यान झालेला हल्ला आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? आदी प्रश्न या सर्व्हेत विचारण्यात आले. विविध भागांत हा सर्व्हे करण्यात आला. त्यातून ममता बॅनर्जी हाच फॅक्टर बंगालमध्ये चालणार असल्याचं दिसून आलं आहे.

हल्ल्याचा फायदा होणार?
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्यावर प्रचारादरम्यान हल्ला झाला. ममतादीदींना त्याचा फायदा मिळेल का? असा सवाल स्थानिकांना विचारण्यात आला. तेव्हा ४७ टक्के लोकांनी ‘हो’ म्हणून सांगितलं. तर ४१ टक्के लोकांनी ‘नाही’ म्हणून सांगितलं. तर ११.३ टक्के लोक काहीच सांगू शकले नाहीत.

कोणता पक्ष सर्वाधिक विकास करेल?
आमच्या टीमने स्थानिकांना कोणता पक्ष पश्चिम बंगालचा विकास करेल असं वाटतं, असं विचारलं तेव्हा ५१ टक्के लोकांनी तृणमूल काँग्रेसच्या बाजूने कौल दिला. यावेळी लोकांनी भाजपला दुसऱ्या क्रमांकाची पसंती दिली. ३८.६ टक्के लोकांना भाजप विकास करेल असं वाटतंय. ७.५ टक्के लोकांना डावे तर १.१ टक्के लोकांना काँग्रेस विकास करेल असं वाटत आहे.

दीदीच हव्या
मुख्यमंत्री म्हणून बंगालच्या जनतेने सर्वाधिक पसंती ममता बॅनर्जी यांच्या नावाला दिली. ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री व्हाव्यात असं ५१.८ टक्के लोकांनी म्हटलं आहे. तर २४.४ टक्के लोकांनी दिलीप घोष, ५.२ टक्के लोकांनी सुवेंदू अधिकारी, ७.९ टक्के लोकांनी सौरव गांगुली, ४.६ टक्के लोकांनी मिथुन चक्रवर्ती आणि २.२ टक्के लोकांनी अदीर रंजन चौधरी यांच्या नावाला पसंती दिली आहे.

कोणता फॅक्टर चालणार?
टीव्ही-९ च्या ओपिनियन पोलनुसार बंगालच्या निवडणुकीत सर्वाधिक चालणारा मुद्दा ममता बॅनर्जी याच आहेत. दुसरा मुद्दा मोदी आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर मुस्लिम फॅक्टर आहे. चौथ्या नंबरवर परप्रांतीयांचा मुद्दा आणि नंतर भ्रष्टाचार, कायदा आणि सुव्यवस्था हे मुद्दे असणार असल्याचं दिसून आलं आहे. ममता बॅनर्जी फॅक्टरला ३९.७ टक्के, मोदी फॅक्टरला २८.६ टक्के, मुस्लिम फॅक्टर ६.३ टक्के. परप्रांतीयांचा फॅक्टर ४.८ टक्के, भ्रष्टाचार फॅक्टर १४.४ टक्के आणि कायदा सुव्यवस्था फॅक्टरला ६.२ टक्के लोकांनी कौल दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER