यूपीए अध्यक्षाच्या भूमिकेत शरद पवार? ममतांचा फोन आणि बंगालकडे सर्वांचे लक्ष

Mamata Banerjee-Sharad Pawar

मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार हे यूपीएचे अध्यक्ष (upa-chairmanship) होतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र पवारांनी यावर स्पष्टीकरण देत या चर्चा फेटाळल्या होत्या. सध्या देशाचं लक्ष पश्चिम बंगालकडे लागलं आहे. भाजपने (BJP) आपला मोर्चा पश्चिम बंगालकडे वळवला असताना, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या (Mamata Banerjee) तृणमूल काँग्रेसला सुरुंग लावण्याचा चंग भाजपने बांधला आहे. अशा परिस्थितीत ममतांनी मदतीसाठी शरद पवारांना साद घातली आहे. शरद पवारांनी (Sharad Pawar) सकारात्मक प्रतिसाद देत, आवश्यकता वाटल्यास पश्चिम बंगालकडे कूच करण्याचे जाहीर केले . यानंतर पुन्हा एकदा संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएचे अध्यक्षपद चर्चेत आले आहे.

सध्याची राजकीय परिस्थिती आणि शरद पवारांचा सर्वपक्षीय संबंध, त्यांचा अनुभव पाहता, यूपीएच्या अध्यक्षपदाच्या निवडीत शरद पवारांची भूमिका महत्त्वाची असणार ही काळ्या दगडावरची रेष आहे.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) या २००४ पासून ते आजपर्यंत यूपीएच्या अध्यक्ष आहेत. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद आधीच सोडलं आहे. त्यानंतर आता यूपीएच्या अध्यक्षपदासाठीही चाचपणी सुरू आहे. अशा परिस्थितीत छोट्या-मोठ्या पक्षांची मिळून बनलेली आघाडी अर्थात यूपीएचं नेतृत्व कोण करू शकतो, असा प्रश्न विचारला जात आहे. आणि या प्रश्नाचे उत्तर बहुतेकांनी शरद पवार असे दिले आहे.

दरम्यान पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी व तृणमूल काँग्रेसमध्ये सध्या अत्यंत तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. भाजपा अध्यक्ष नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भाजपा अधिकच आक्रमक झाली असून, टीमसीला सर्वतोपरी कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व टीएमसी अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनीदेखील राजकीय हालचाली वेगवान केल्याचे दिसत आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी या संदर्भात चर्चा केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER