ममता बॅनर्जींनी शपथपत्रात गुन्ह्यांची माहिती लपवली, भाजपकडून राजीनाम्याची मागणी

Mamata Banerjee - BJP

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Elections) रणधुमाळीत आता आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रात काही गुन्हे लपवल्याचा आरोप भाजपने केला. आणि या मुद्द्यावरुन ममता बॅनर्जी यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी भाजपडून (BJP) केल्या गेली आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रचारादरम्यान झालेल्या अपघातानंतर थेट व्हीलचेअरवर बसून ममता बॅनर्जी यांनी प्रचाराला सुरूवातही केली आहे. अशावेळी नंदीग्राममधील भाजपचे उमेदवार शुवेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप केला आहे. उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रावर ममतांनी आपल्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा उल्लेख केला नसल्याचा आरोप अधिकारी यांनी केला आहे. तसंच ममता यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणीही त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

शुवेंदु अधिकारी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून ममता बॅनर्जींवर गुन्हे लपवल्याचा आरोप केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा हवाला देत त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, ममता बॅनर्जी यांच्याविरोधात 6 गंभीर गुन्हे प्रलंबित आहेत. त्यातील 5 आसाममध्ये तर 1 सीबीआयच्या अधीन आहे. मात्र त्यांनी दिलेल्या शपथपत्रात त्याचा उल्लेख केलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार जर एखादा उमेदवार त्याच्याविरोधातील गुन्हे लपवत असेल तर त्याची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते. या आधारावर ममता यांची उमेदवारी रद्द केली जावी, अशी मागणी अधिकारी यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER