लॉकडाऊनवर मार्ग काढा, अन्यथा उद्रेक होईल; फडणवीसांचा ‘ठाकरे’ सरकारला गर्भित इशारा

devendra fadnavis & Uddhav Thackeray

मुंबई :- महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढ होत असल्याने सरकारने आमच्यासोबत चर्चा करून शनिवार आणि रविवारला कडक लॉकडाऊन (Lockdown) आणि इतर दिवशी निर्बंध घालण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आठवड्याचे सातही दिवस १०० टक्के लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे राज्यभरातील व्यापारी, छोटे-मोठे व्यवसायी रस्त्यावर उतरले आहेत. राज्य सरकारने पुन्हा सर्वांशी चर्चा करून निर्बंधांमध्ये बदल करून मार्ग काढावा. जर लवकर तोडगा काढला गेला नाही तर महाराष्ट्रात मोठा उद्रेक दिसून येईल, असा गर्भित इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ‘ठाकरे’ सरकारला दिला आहे. तर आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी फडणवीसांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. राज्यात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या वाढत आहे हे सरकारला माहिती होते. एवढे दिवस शांत बसण्यापेक्षा उपाययोजना राबवण्याची आवश्यकता होती.

हॉस्पिटल्स, कोविड सेंटर उभारण्याची गरज होती. आज राज्यात रुग्णांना बेड्स मिळत नाही, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा, कुठे काळाबाजार होताना दिसून येत आहे. वर्षभरात केवळ सरकार वाचवण्यात यांनी वेळ घालवला. कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे राज्यावर ही परिस्थिती आली आहे. सरकारने वेळीच दखल घेतली नाही तर पुढच्या १५ दिवसांत महाराष्ट्रात भयानक स्थिती निर्माण होईल, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली. सरकारने निर्बंधाच्या नावावर राज्यातील जनतेची, छोट्या-मोठ्या व्यवसायकांची आणि व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे. निर्बंधाच्या नावाखाली १०० टक्के लॉकडाऊन केले. ही जनतेची फसवणूक आहे. मला १७ असोसिएशनचे लोक आतापर्यंत भेटले. आम्ही कोरोना उपाययोजनांबाबत सरकारला पूर्ण पाठिंबा दिला. पण आता कडक निर्बंधांऐवजी सातही दिवस पूर्ण लॉकडाऊन दिसतो आहे. यामुळे व्यापारी आणि छोटे व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांची फरफट होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारने यावर चर्चा करून मार्ग काढावा; अन्यथा उद्रेक होईल, असा सूचक इशाराही फडणवीसांनी राज्य सरकारला दिला. राज्य सरकारच्या बोलण्यात आणि करण्यात मोठं अंतर आहे. ज्या दिवशी सरकारने निर्बंघ लावण्याची घोषणा केली तेव्हा ते योग्य वाटत होते. वीकेंडला पूर्ण लॉकडाऊन आणि अन्य पाच दिवस पुणे किंवा नागपूर पॅटर्न राबवला जाईल असं वाटत होतं. पण सरकारनं सातही दिवस पूर्ण लॉकडाऊन केल्याचं पाहायला मिळतं आहे. पोलिसांकडून बळाचा वापर करून निर्बंध लादले जात आहेत, असा आरोप फडणवीसांनी केला. राज्यात तीन दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा शिल्लक असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितलं. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे महाराष्ट्राला आठवड्याला ४० लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी केली. महाराष्ट्राला वेळेत पुरवठा झाला नाही तर तीन दिवसांत लसीकरण बंद पडण्याची भीती टोपे यांनी व्यक्त केली आहे. यावर उत्तर देताना फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. राज्य सरकारमधील मंत्री आणि नेते लसीकरणासंदर्भात करत असलेला आरोप चुकीचा आहे. राज्यातील लसीकरणाची क्षमता आणि टार्गेट ग्रुपला आवश्यक पुरवठा करण्यात येत असल्याचा दावाही फडणवीसांनी केला.

केंद्र सरकारकडून देशभरात सर्वांत जास्त लसी या महाराष्ट्राला दिल्या आहेत. भारत सरकार काही वेगळं आहे का? या गोष्टी माध्यमांशी बोलण्याऐवजी केंद्राशी चर्चा करणं गरजेचं आहे. अशी चर्चा केली जात नाही. माध्यमांमध्ये बोलायचं आणि हात झटकायचं हे बंद झालं पाहिजे. विरोधकांना म्हणायचं राजकारण करू नका आणि सरकारमधील मंत्री, मुख्यमंत्र्यांनीच राजकारण करायचं हे योग्य नाही, असंही फडणवीसांनी म्हटलं. राज्यात अनेक शहरांतील रुग्णालयांत रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. रेमडेसिवीरचा काळाबाजार सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. त्याबाबतही फडणवीसांनी सरकारला आवाहन केलं. राज्य सरकारनं रेमडेसिवीरबाबत तत्काळ कारवाई करायला हवी. इंजेक्शनचा काळाबाजार रोखला पाहिजे, अशी मागणी फडणवीसांनी राज्य सरकारकडे केली.

ही बातमी पण वाचा : फडणवीसांना दुहेरी जबाबदारी, बेळगाव पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून संधी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button