‘कलाब्धि’ कलांचे आणि कलाकारांचे व्यासपीठ बनावे :डॉ. अभिनव देशमुख

Abhinav Deshmukh

कोल्हापूर :’कलाब्धि’ देशभरातील कलांचे आणि कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ बनावे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी केले. ते पोलीस गार्डन, पोलीस मुख्यालयासमोर येथे विनस्पायर आयोजित व कलाब्धि राष्ट्रीय कला महोत्सव-२०२० च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

ते म्हणाले, कोल्हापूरची संस्कृती आणि कला परंपरा फार मोठी आहे. त्याला आजच्या काळात व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे आणि हे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी विन्स्पायर फाऊंडेशन आणि कलाब्धि टीमला कोल्हापूर पोलिसांचे पूर्ण सहकार्य आहे आणि भविष्यात देखील हे सहकार्य असेच राहील. यावेळी घाटगे-पाटील उद्योग समूहाच्या मेघा पाटील, रोटरीचे सुरेंद्र जैन, घाटगे उद्योग समूहाच्या सौ. नवोदिता घाटगे, सौ. वेदांतिका माने, सौ. जिया झंवर आणि व्ही स्टाईल ग्रुपच्या सौ. बिना जनवाडकर, यतीन जनवाडकार यांची प्रमुख उपस्थिती होती. देशभरातून शेकडो कलाकार या महोत्सवासाठी आले आहेत. कारागिरी, वस्त्र कलाकुसर, दागिने, खाद्यजत्रा अशा वेगवेगळ्या गोष्टींचे स्टॉल लागलेले आहेत.

दोन दिवस कार्यशाळा, विविध स्पर्धा, मनोरंजनाचे कार्यक्रम खाद्यजत्रा असा भरगच्च कार्यक्रम आणि त्याची मेजवानी कोल्हापूरकरांसाठी या ठिकाणी आयोजित केलेली आहे. तरी या महोत्सवाला आणि प्रदर्शनाला कोल्हापूरकरांनी भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.