काँग्रेसला मजबूत करण्यासाठी पवारांकडे युपीएचे नेतृत्व द्या, राऊतांची काँग्रेसकडे आग्रही मागणी

Sanjay Raut-Sharad Pawar

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी (sanjay Raut) संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीएबाबत(UPA) मोठं विधान केले आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राऊत यांनी युपीएचं पुनर्गठन व्हावं, जर युपीएला मजबूत करायचं असेल तर युपीएचं अध्यक्षपद शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे द्यावं, असंही संजय राऊत म्हणालेत. राऊत यांनी या मुलाखतीत युपीएच्या नेतृत्वावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. युपीएचं नेतृत्व बदलून, ते अशा हाती देण्यात यावं ज्यांना विरोधक स्वीकारतील, असं म्हणत राऊत यांनी युपीएच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

राऊत म्हणाले, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा जो प्रयोग झाला आहे, तो उत्तम ठरला आहे. संपूर्ण देश आमच्याकडे बघत आहे. आम्ही सतत आव्हान केलं आहे की, युपीएचं पुनर्गठन व्हायला हवे. संजय राऊत विचारण्यात आलं की, तुम्ही युपीएचे घटक नाहीत. त्यावर संजय राऊत म्हणाले की, आता आम्ही एनडीए (राष्ट्रीय लोकशाही आघाडी)तून बाहेर पडलो आहोत. अकाली दलही एनडीएतून बाहेर पडला आहे. ममता बॅनर्जीही युपीए किंवा एनडीए मध्ये नाहीत. असे अनेक प्रादेशिक पक्ष आहेत जे एनडीए किंवा युपीएचे घटक नाहीत. ते युपीएमध्ये का नाहीत यावर विचार करण्याची गरज आहे.

राऊत पुढे म्हणाले, ‘काँग्रेसला आपला पक्ष मजबूत करायचा असेल तर युपीएला मजबूत करावं लाइग्ल. आणि युपीएला मजबूत करायचं असेल तर त्याचं नेतृत्व अशा व्यक्तीकडे द्यावे जो ॲक्टिव्ह असेल आणि विरोधकांमध्ये त्यांच्या नावावर सहमती असेल’. तेव्हा संजय राऊतांना असं कुठलं व्यक्तीमत्व आहे ज्याच्या नावावर सहमती होईल, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा राऊत यांनी केवळ शरद पवार यांचंच नाव समोर येतं असल्याचं स्पष्ट केलं. काँग्रेस नेत्यांनी ते स्वमर्जीने स्वीकारायला हवं. शरद पवार यांना युपीएचा अध्यक्ष बनवल्यावर युपीए अधिक मजबूत होईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER