कोविड-१९ च्या चाचण्या निःशुल्क करा; सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला

make-all-covid-19-tests-free-for-citizens-Supreme Court advises

नवी दिल्ली :- सर्व नागरिकांची कोविड – १९ ची चाचणी निःशुल्क होईल या दृष्टीने प्रयत्न करा, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अशोक भूषण आणि एस.रवींद्र भट यांच्या खंडपीठाने बुधवारी केंद्र सरकारला दिला. सध्या खासगी प्रयोगशाळात कोरोना व्हायरसच्या चाचणीसाठी ४,५०० रुपये आकारण्याची परवानगी देण्यात आली आहे.

याबाबत एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, कोरोना व्हायरसच्या चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळांना भरपाई देणे शक्य आहे का, त्याची व्यवहार्यता तपासून पाहा. हे शक्य झाल्यास नागरिकांना पैसे भरावे लागणार नाहीत असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

“कोरोना व्हायरसच्या चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळांना इतके महागडे दर आकारण्याची परवानगी देऊ नका. सरकारकडून खासगी प्रयोगशाळांना भरपाई देण्यासाठी यंत्रणा तयार करा. ” असा सल्ला न्यायमूर्ती भूषण यांनी दिला. केंद्र सरकारच्यावतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता सर्वोच्च न्यायालयात उपस्थित होते.

कोरोना व्हायरसच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चाचणीसाठी सरकारी प्रयोगशाळा पुरेशा नाहीत. त्यामुळे खासगी प्रयोगशाळांनासुद्धा चाचणीची परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार देशात सध्या कोरोना व्हायरसची ५१९४ प्रकरणे आहेत.

सरकारी रुग्णालयांवरील भार वाढला असून तिथल्या प्रयोगशाळांमध्ये कोरोनाची चाचणी करणे सर्वसामान्यांसाठी कठीण झाले आहे, असे याचिकाकर्ते शशांक देव सुधी म्हणाले. ते स्वत: वकील आहेत. लोकांसमोर पर्याय नसल्याने त्यांना जास्त पैसे मोजून खासगी प्रयोगशाळेत चाचणी करावी लागत आहे, असा याचिकाकर्त्याचा मुद्दा आहे.