फक्त १२० भारतीय सैनिकांना घेऊन हजारो चीनी सैनिकांचा खात्मा करणारे मेजर शैताम सिंग!

Maharashtra Today

भारतीय सैनिकांचा मोठा गौरवशाली इतिहास आहे. देशातल्या वीर जवानांनी अनेक बलिदान दिलेत. त्यांच्यामुळं अनेक जवान छाती ताणून देशाची गर्वानं सेवा करतात. भारत- चीन युद्धात देशासाठी जीव देणाऱ्या महान शुरवीरांपैकी एक होते मेजर शैतानसिंग (Major Shaitam Singh). त्यांनी १९६२च्यायुद्धात एका छोट्या सैन्य तुकडीचं नेतृत्व केलं. सैन्याला प्रोत्साहित केलं. त्यांच्या तुकडीनं छातीचा कोट करत गाजवलेल्या पराक्रमामुळं आजही भारतीय सैन्य ताठ मानेनं चीनच्या नजरेत नजर मिळवून उभं राहू शकतं. त्यांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी त्यांना मरणोत्तर परमवीरचक्रानं सन्मानित करण्यात आलं.

बालपण

शैतानसिगं यांचा जन्म लष्करी परंपरा असलेल्या घराण्यात जोधपूर (राजस्थान) मध्ये १ डिसेंबर १९२४ साली झाला. त्यांचे वडील हेमसिंगजी हे भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल होते. त्यामुळे लहानपणापासूनच सैन्यात जाण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. जोधपूर येथे सुरुवातीचे शिक्षण घेऊन त्यांनी सैन्यदलातील भरतीसाठी मुलाखत दिली. सैन्यदलात कमिशन मिळवून (१ ऑगस्ट १९४९) कुमाऊँ रेजिमेंटमध्ये त्यांची अधिकारी पदावर नियुक्ती झाली. १९६१ मध्ये जेव्हा गोवा मुक्तीसंग्रामास सुरुवात झाली त्यात शैतानसिंग यांनी मोठं शौर्य गाजवलं होतं. त्यांच्या शौर्याकडं बघून त्यांना मेजरची पदापर्यंत मजल मारता आली.

भारत- चीन युद्ध

भारतानं स्वातंत्र्यानंतर अलिप्तवादाचं धोरणं स्वीकारलं. इतर राष्ट्रांसाठी नेहमी स्नेह आणि आदराची भुमिका घेतली. चीनसोबतही संबंध सुधारायचा भारताचा प्रयत्न होता. परंतु चीननं मैत्रीचा एक हात पुढं करत भारताला अलिंगन दिलं आणि दुसऱ्या हातानं खंजीर भारताच्या पाठीत खुपसला. भारत- चीन युद्धाला सुरुवात झाली. भारत-चीन संघर्षाच्या वेळी (१९६२) पूर्वेकडील अतिउंच आणि बर्फाच्छादित व लष्करीदृष्ट्या दुर्लक्षित प्रदेशात चीनने अचानक हल्ला करुन राजकाण्यांना आणि लष्करी अधिकाऱ्यांना धक्का दिला.

शैतान सिंगांचा पराक्रम

युद्धाला अचानक तोंड फुटलं. पुरेशी तयारी करण्याची संधी देखील भारतीयांना मिळाली नाही. शैतान सिंगांची एकमेव कुमाऊँ पलटण (रेजिमेंट–१३ क्रमांक) या भागात तैनात करण्यात आली. ब्रिगेडियर टी. एन्. रैना हे या भागाचे कमांडर होते. ही तुकडी अंबाल्याहून जम्मू-काश्मीरमध्ये गेली (जून १९६२). बर्फाच्छादित थंड प्रदेशाचा अनुभव नसलेल्या जवानांना या अतिउंच पहाडी प्रदेशात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. तेथे तैनात केलेले चिनी सैनिक सिंक्यांग पर्वतावर वास्तव्य करणारे होते. त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रास्त्रे, मशीनगन्स होत्या. याउलट भारतीय जवानांकडे दुसऱ्या महायुद्घातील वापरलेल्या कुचकामी झालेल्या ३०३ एकबारी, ली एनफिल्ड बनावटीच्या बंदुका होत्या. शैतानसिंग यांच्या तुकडीनं जोरदार हल्ला केला. त्यांच्या पराक्रमामुळं चीनी सैन्याला मोठा तडाखा बसला.

प्रतिकुल परिस्थीतीत जवानांनी दिली झुंज

अधुनिश शस्त्र आणि पुर्वतयारीच्या जोरावर चीननं हल्ला चढवला होता. अशा प्रतिकूल परिस्थितीतही हे जवान कोणतीही पर्वा न करता चिनी तुकडीशी रेझांग ला या ठिकाणी मेजर शैतान सिंग यांच्या नेतृत्वाखाली तोंड देण्यासाठी सज्ज झाले. त्यांनी सर्व मार्गांवर स्वयंचलित तोफा आणि मशीनगन्स रोखून शत्रूच्या वाटा रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यात अनेक चिनी सैनिक मृत्युमुखी पडूनसुद्घा त्यांच्या तुकड्या एकामागून एक येतच राहिल्या. त्यांनी भारतीयांचे चौकी पहारे उद्ध्वस्त केले आणि सर्व सैनिक ठार केले. या धुमश्चक्रीत मेजर शैतान सिंगांवर मशीनगनमधून गोळ्यांचा वर्षाव झाला. त्यात ते जबर जखमी झाले. त्यांच्या उर्वरित साथीदारांनी त्यांना सुरक्षित स्थळी नेण्याचा प्रयत्न केला तरी या कृत्यात जवानांच्या जिवाला धोका आहे, हे ओळखून त्यांनी आपणास त्याच ठिकाणी सोडून सर्वांनी सुखरुप स्थळी परतावं असा आदेश दिला. जड अतंकरणानं त्यांच्या साथीदारांनी त्यांना तिथंच सोडून ते निघाले.

तीन महिन्यानंतर सापडला मृतदेह

देशाप्रतिचं कर्तव्य अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी निभावलं. तीन महिन्यानंतर त्यांचा मृतदेह त्या बर्फाच्छादित प्रदेशात सापडला. तो जोधपूरला नेण्यात येऊन सैनिकी इतमामाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतीय सेनादलाच्या इतिहासात रेझांग लाची लढाई शैतान सिंगांच्या असामान्य पराक्रम आणि नीतिधैर्याने अद्वितीय ठरली. त्यांच्या या पराक्रमाबद्दल त्यांना परमवीरचक्र या अत्युच्च सैनिकी सन्मानाने मरणोत्तर गौरविण्यात आलंय. भारतीय सैन्यासाठी त्यांच नाव एका आदर्शाहून कमी नाहीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button