पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी राजकीय घडामोड; मनसेची शिवसेनेला थेट मदत

CM Uddhav Thackeray - Raj Thackeray - Maharashtra Today

पिंपरी-चिंचवड :- मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi) हल्लाबोल करताना दिसत आहेत. मात्र आता पिंपरी-चिंचवडच्या स्थानिक राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. पिंपरी-चिंचवडमधील मनसेचे नगरसेवक आणि शहराध्यक्ष सचिन चिखले शिवसेनेच्या (Shiv Sena) मदतीला धावून आले आहेत.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे नगरसेवक सचिन भोसले (Sachin Bhosale) जलपर्णी गळ्यात घालून सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आले होते. मात्र, त्यांना सभागृहात प्रवेश नाकारण्यात आला. सुरक्षा रक्षकांनी तासभर त्यांना दारावरच उभं ठेवलं होतं. तेव्हा महाविकास आघाडीचे नगरसेवक मदतीला धावून गेले. मनसे नगरसेवक सचिन चिखलेही तिथं पोहचले आणि भोसलेंना आत सोडलं नाही तर सभा बंद पाडू, असा दम चिखलेंनी भरला. या प्रसंगी सुरक्षा रक्षक आणि नगरसेवक भोसलेंमध्ये धक्काबुक्की झाली.

शहरातून गेलेल्या पवना नदीवर जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी परिसरात दुर्गंधी आणि मच्छरांचा त्रास होऊ लागला. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आधीच कोरोनाने नागरिक त्रस्त आहेत, त्यात नवं संकट नको. अशी परिस्थिती असताना जलपर्णी का हटवली जात नाही, ज्यांना काम दिलं ते हलगर्जीपणा का करत आहेत, याबाबतचा जाब विचारण्यासाठी शिवसेना नगरसेवक सचिन भोसले जलपर्णी गळ्यात घालूनच महापालिकेत अवतरले. तर एक जलपर्णीचा हार संबंधित अधिकाऱ्याला घालण्याच्या विचाराने आले होते. आजच्या सर्वसाधारण सभेत भाजप आणि प्रशासनाला ते धारेवर धरणार होते. मात्र, तत्पूर्वीच भोसलेंना सभागृहाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांकडून रोखण्यात आलं. इतर सर्व नगरसेवक सभागृहात पोहचले; पण बराच वेळ गेला तरी आपल्या सहकाऱ्याला आत येऊ दिलं जात नाही. ही बाब महाविकास आघाडीमधील नगरसेवकांच्या लक्षात आली, मग ते प्रवेशद्वारावर आले. या सर्वांचे सुरक्षा रक्षकांशी वाद सुरू झाले. तेव्हा मनसेचे निवडून आलेले एकमेव नगरसेवक सचिन चिखलेही शिवसेना नगरसेवक भोसलेंच्या मदतीला पोहचले.

भोसलेंना तातडीने आत सोडा असं चिखले म्हणाले, यावर महापौरांच्या सूचना असल्याने सोडता येणार नाही, असं सुरक्षा रक्षक म्हणाले. यावर शहरातील प्रश्न आहे ना? मग त्यावर सभागृहात आवाज उठवायचा नाही का? तुम्ही दादागिरी करू नका? एक तासापासून तुम्ही त्यांना कसं काय रोखून धरलं, ते नगरसेवक असताना अशी वागणूक का देताय, आता त्यांना लगेच आत सोडलं नाही तर सभागृह बंद पाडेन, अशी धमकीच चिखलेंनी दिली.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. विविध प्रश्नांवरून सरकारचे वाभाडे बाहेर काढत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारही त्यांना जशास तसं उत्तरं देतात. विनामास्क वावरणाऱ्या राज ठाकरेंना तर सत्ताधाऱ्यांनी चहूबाजूंनी घेरलं. अशी परिस्थिती असताना पिंपरी-चिंचवड महाविकास आघाडीच्या मदतीसाठी मनसेचे नगरसेवक धावल्याने मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरेंच्या मनसेत जोरदार इनकमिंग ;  शिवसेनेसह विविध पक्षातील कार्यकर्त्यांची कृष्णकुंजवर गर्दी 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER