कोरोनाचे निकष पाळत कार्तिकी यात्रेची परंपरा कायम ठेवा

- भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे आवाहन

कार्तिकी यात्रा - आचार्य तुषार भोसले

मुंबई : कोरोनाचे (Corona) निकष पाळत कार्तिकी यात्रेत मर्यादित संख्येत भाग घेऊन यात्रेची परंपरा कायम ठेवा, असे आवाहन भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीने केले. यात्रेसंदर्भात भूमिका ठरविण्यासाठी आघाडीची बैठक प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

बैठकीत एकमताने झालेला निर्णयाची माहिती देताना तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) म्हणाले, कोरोनाच्या साथीमुळे आणि शासन प्रशासनाची काहीही तयारी नसल्यामुळे आषाढी यात्रा रद्द करावी लागली. या निर्णयाचे आम्ही स्वागत केले होते. सर्व वारकरी मंडळींनी शासनाला सहकार्य केले होते. आता मात्र सर्व व्यवहार सुरळित झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेत शेकडो वर्षांची कार्तिकी यात्रेची परंपरा देखील जपली जाईल असा समन्वयाचा मार्ग राज्य सरकारने काढायला हवा. याकरिता वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ-श्रेष्ठ महाराज मंडळी, फडकरी, मठाधिपती, संस्थानिक आदींनी काही प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवले आहेत. राज्य सरकारने लवकरात लवकर यासंदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा व तो जाहीर करावा जेणेकरून शासनाच्या नियमांनुसार दिंड्यांना आपापले नियोजन करता येईल.

राज्य शासनाने वारकरी संप्रदायाच्या भावनांचा आदर राखून कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचा धोका न पत्करता योग्य ती खबरदारी घेऊन, यात्रेची परंपरा अखंडित ठेवावी व ती निर्विघ्नपणे पार पाडावी, अशी आमची भूमिका आहे, असे ते म्हणालेत.

बैठकीला वारकरी महामंडळाचे अध्यक्ष तथा श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे विश्वस्त प्रकाश महाराज जवंजाळ, अ. भा. वारकरी महामंडळाचे केंद्रीय धर्मसभा अध्यक्ष भाऊ महाराज फुरसुंगीकर, श्रीनिवृत्तीनाथ संस्थान त्र्यंबकेश्वरचे विश्वस्त संजयनाना महाराज धोंडगे, तीर्थक्षेत्र व देवस्थान विभागाचे समन्वयक राजेश महाराज देगलूरकर, पश्चिम महाराष्ट्र संयोजक संजय घुंडरे पाटील व अन्य प्रतिनिधी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER