अजित पवारांमुळे आघाडीच्या मंत्र्यांचा हिरमोड; बंगल्यांवर मर्यादित खर्च करण्याचे आदेश

Ajit Pawar

मुंबई : राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्यांच्या डागडुग्गीजीसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्या होत्या. आता याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल घेतली आहे. बंगल्यांवर होणारा खर्च मर्यादित ठेवा, असा आदेश अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.

तसंच वास्तुविशारदांनी सुचवलेल्या महागड्या वस्तूंचा खर्च टाळावा, अशी सूचनाही अजित पवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केली आहे. यासंदर्भात पत्रक जारी करण्यात आलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ३१ बंगल्यांसाठी निविदा काढल्या आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी जवळपास १५ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. म्हणजेच एका बंगल्यावर साधारणत: ८० लाख ते दीड कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. या संदर्भातील बातम्या झळकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुरुस्तीचा खर्च मर्यादित ठेवण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान, २००९ साली स्थापन झालेल्या आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या देवगिरी बंगल्यावर असाच लाखोंचा खर्च करण्यात आला होता.

माहिती अधिकारात ही बाब उघड होताच अजित पवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला २७ लाखांचा चेक सुपूर्द केला होता. आता अजित पवारांचा हाच आदर्श महाराष्ट्र विकास आघाडीतले मंत्री घेणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

‘लाभाच्या पदांमुळे’ शिवसेनेच्या दोन मंत्र्यांचे पुनर्वसन गोत्यात