“मैने कहा फुलोंसे – हसो तो वो खिलखिला के हस दिये …”

willpower - Maharashtra Today

सकारात्मक मानसशास्त्राच्या आपल्या प्रवासात ,आज अचानक “मिली” मधलं, हे गाणं आठवलं ! खरंच जगणं म्हणजे खूप छान ,आनंदी वाटणे, खळखळून हसावसं आणि नाचावस वाटणे.. हे पूर्ण आपल्या स्वतःवर अवलंबून असतं. पण जगात असेही लोक असतात, त्यांचाही आपल्याला विचार करावा लागतो, कि जे स्वतःला सदैव “बिचारे” समजत असतात .ते म्हणवून घेण्यात त्यांना स्वतःला काहीतरी सुख मिळत असतं . सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्यावे ,असही काहीस त्यांचं म्हणणं असतं. म्हणजे सगळे काही छान चालू असताना सुखात मिठाचा खडा असावा तसे वर्तन करणाऱ्या व्यक्ती आपल्याला व्यवहारात दिसत असतात. याला सेल्फ पिटी किंवा आत्मदया असही म्हणता येईल.

शाळेत शिकत असतात ,तोपर्यंत शिक्षण पद्धती कशी विना उपयोगाची ! मग मार्कांचा फुगवठा ! कॉलेजमध्ये असताना नको होता तो अभ्यासक्रम मला घ्यायला लावला, छान नोकरी मिळाली मग, पगार देतात भरपूर, पण पार पीचवून घेऊन काम करून घेतात हो ! किंवा ग्रोथ काही नाही म्हणून हातची चांगली नोकरी सोडतात. नाहीतर बॉस आणि कलिग एकदम डोक्यातही जात असतात त्यांच्या ! गृहस्थाश्रमातील स्त्री-पुरुष असतील तर मोठा मुलगा किंवा मोठी सून म्हणून कशा जबाबदाऱ्या अंगावर येऊन पडतात, म्हणून बिचारे म्हणतात .नाहीतर सगळ्यात धाकटे म्हणून आपल्याला कोणी महत्त्वच देत नाही म्हणून रडू शकतात. थोडक्यात काय ऊन पडलं म्हणून रडायचं ,थंडी वाजली म्हणून रडायचं, पावसाळ्यात चिकचीकाट म्हणून रडायचं ! अशी साधारण यांची प्रवृत्ती !

फ्रेंड्स ! एकूणच काय न , अशा आत्मदया असणाऱ्यांचा एक वर्गच असतो सगळीकडे ! दुसऱ्या महायुद्धातील संहाराच्या कथा अजूनही आपल्या अंगावर काटा आणतात. पण त्याच पार्श्वभूमीवर आपल्या स्वतःच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि दृष्टिकोनामुळे आशेचे किरण फडकवणारे असेही काही लोक असतात. जर्मनीतील एक ज्यू शास्त्रज्ञ विक्टर फ्रांकल ! ज्यू साठीच्या छळछावणी मध्ये स्वतःच्या नावापासून , सगळे काही गमावले पण स्वतःचे मनोबल मात्र त्यांनी कायम ठेवले. कसे? त्याच्याकडे विश्वास होता की,” त्यांनी माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतलं ,पण त्यांना घेता येत नाही अशी एक गोष्ट माझ्याकडे आहे आणि तो म्हणजे माझा दृष्टिकोन ! “म्हणजे रोज उठल्यावर केवळ ,”मी आहे” ही अनुभूतीच मला तो दिवस पार पाडण्याचं बळ देत होती असं त्यांनी लिहून ठेवलेल आहे. हे एवढंसं वाक्य किती जीवनाचा अर्थ सांगतं आपल्याला !

विचारांची ही खोली म्हणजेच माणसाची सगळ्यात मोठी ताकद आहे. मानवाच्या इतिहासामध्ये सुद्धा रक्तपात ,घातपात ,जिंकणं, हरणं याची जेवढी नोंद केली गेली तेवढी समाज निर्माण करण्यामध्ये असलेल्या छोट्या छोट्या प्रयत्नांचा कुठेच उल्लेख नाही. मानसशास्त्रही याला अपवाद नव्हते. पण आता आपण काही लेखांमध्ये बघतो आहे त्याप्रमाणे केवळ त्रुटी, दोष, दुबळेपणा, विकृती यावर संशोधन न होता माणसाच्या स्वभावातील उमदेपणा ,आशावादी वृत्ती अशा सकारात्मक मानसशास्त्राला पण महत्त्व आलेलं आहे. मार्टिन सेलिगमन याने आणलेल्या या संकल्पनेला सकारात्मक मानसशास्त्र किंवा आश्वासक मानसशास्त्र असं सुद्धा म्हटलं जातं.

अशी आश्वासक मनस्थिती असणारे लोक असतात कसे ? नेहमीच माहिती ,information किंवा थिअरी ,आपल्याला सगळं समजून देत नसते त्यापेक्षा काही उदाहरणं बघितली तर ?त्यातून आपल्याला ही आतून येणारी सकारात्मकता सहज कळते.

अशी उदाहरणे देखील आपल्याला खूप बघायला मिळत असतात .आता हेच बघा ना ! जगभरातल्या बातम्यांचा कानोसा घेता घेता अशीच एक बातमी माझ्या समोर आली .कंट्री फुड्स या पेजला भेट दिली तर एका आजीच्या चाहत्यांचे तिच्यावरचे प्रेम बघायला मिळेल. तिचं नाव मस्तान अम्मा. आंध्र प्रदेशातली एकशे सात वर्षांची बाई म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येते ती अंथरुणाला खिळलेली आजी. पण मस्तान अम्मा एकदमच वेगळी. तिच्या वयाच्या 105 व्या वर्षी तिने नातवांच्या मदतीने यूट्यूब चैनल सुरू केले. हि अाजी कायम चुलीवर मोकळ्या हवेत स्वयंपाक करायची. आणि मिक्सर चाकू या सगळ्यापेक्षा तिने कायम हाताची नखे विळी खलबत्ता वापरला. चष्मा नाकापर्यंत ओघळलेली, कृश, रापलेला वर्ण अशी आजी जेव्हा चुली समोर बसते तेव्हा तेव्हा तिची समाधीच लागते जणू !भांड्यांसाठी देखील ती परिसरातल्या वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करते .कलिंगडाच्या आतला गर काढून त्यात केळ्याची पाने लावून आत मध्ये मस्त चिकन शिजवते. तसाच प्रयोग शहाल्याच्या आत पदार्थ शिजवून देखील करते. मुख्य म्हणजे तिच्या चॅनलला फक्त दोन वर्षांमध्ये बावीस लाख लोकांनी सबस्क्राईब केलं. तिचे व्हिडीओज २०१९ पर्यंत 20 कोटी 21 लाख पेक्षा जास्त वेळा पाहिले गेले. इंग्रजी बोलता न येणाऱ्या ह्या आजीची देश-विदेशात नातवंड आहे. ही आजी अलीकडेच जेव्हा वारली तेव्हा जगभरातल्या नातवंडांना भरवण्यात आनंद मानणाऱ्या , या आजीची नातवंड अचानक पोरकी झाली. अशी ही अन्नपूर्णा !

असाच एक किस्सा ,स्वतः वर प्रेम करणाला ! आत्मिक आनंद असणारा !केस हा स्त्रियांचाच नव्हे तर पुरुषांचा देखिल सॉफ्ट कॉर्नर समजला जातो. आपल्याकडे अजूनही काळेभोर लांबसडक केस सौंदर्याचे मापक तर पांढरे केस हे वृद्धपणाचे लक्षण समजले जाते. बाजारात दररोज नवीन डाय पण येतात .थोड्याफार फरकाने सर्वत्र हीच परिस्थिती आहे. 2018 मध्ये केलेल्या एका पाहणीत पिंटरेस्ट वरती” गोईंग ग्रे, “असा सर्च करणाऱ्यांच्या संख्येत तब्बल 897 टक्‍क्‍यांची वाढ झाली होती. नैसर्गिक रित्या केसांना पिकू द्यावे, उगाच त्यांच्या पांढरे होण्याच्या प्रक्रियेत डायचा अडसर घालू नये असा विचार करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. आपण स्वतःला जसे आहोत तसे स्वीकारले तर त्याचा परिणाम आपला आत्मविश्वास वाढण्यात होतो असे अनेक मानसशास्त्रज्ञांची मत आहे. पूर्वीच्या पुरुषांपेक्षा त्याच वयाची स्त्री मात्र काळा-पांढरा केसांमध्ये “ओड् वूमन आउट” दिसते, या सामाजिक प्रवादा ला अनेक जणी मोडून काढतात आहे. आज अनेक मॉडेल्स देखील असे पांढरे केस अभिमानाने मिरवत आहेत .स्वतःवर खूष राहणारयांची वाढती संख्या सौंदर्याच्या नव्या परिभाषा निर्माण करते आहे हेच खरे .

आपलं अस्तित्व ,आपण जगतो का आहोत ? याचा शोध सकारात्मक मानसशास्त्रात लागत असतो. भावनिक आणि मानसिक फिटनेस याला आता करिक्युलम चा भाग बनवले गेले आहे. याविषयी एका व्हिडिओमध्ये भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय संघटन मंत्री,श्री मुकुल कानिटकर हे बोलताना म्हणाले व्यक्तिकेंद्रिततेचा विस्तार करत जेव्हा व्यक्ती ‘ मी ‘कडून ‘आम्ही’ कडे जाते, तेव्हा आयुष्याचे ध्येय बदलून जाते, व्यक्ती जेव्हा राष्ट्रसाठी काम करते, तेव्हा हा तिची शारीरिक मानसिक अध्यात्मिक शक्ती वाढत जाते. म्हणजे तिचे लक्ष लक्झरी किंवा भौतिक स्वास्थ्य हे न राहता एक कर्तव्य म्हणून व्यक्ती स्वतःच्या स्वास्थ्याकडे बघते, म्हणजे” मी फिट तर भारत फिट,” व्यक्ती कडून समष्टीकडे होणारा हा प्रवास, खऱ्या अर्थाने भावनिक आणि मानसिक फिटनेस मिळवून देतो. केवळ मेंटेनन्स करणे शरीराचे , जपणे म्हणजे फिटनेस नाही, घरात चकचकीत कार आणायची आणि आणि त्याला स्‍क्रॅचेस जाऊ नये,इजा होऊ नये म्हणून वापरता ठेवून देण्यासारखे आहे. जगण्याचे मर्म इतक्या छान शब्दात त्यांनी सांगितलेला आहे.

फ्रेंडस् ! आश्वासक किंवा सकारात्मक मानसशास्त्र ही पुस्तकात अभ्यासाची गोष्टच नाही, ती अनुभवायची ,निरीक्षण करण्याची आणि अनुकरण करण्याची चिज आहे. बरेच लोक बदल लवकर स्वीकारू शकत नाही, घाबरतात. समायोजन करू शकत नाही. परंतु कुटुंब ,समाज ,व्यवसाय, नातेसंबंध यांचे स्वरूप तर कायमच झपाट्याने बदलते. डॉक्टर स्पेन्सर जॉन्सन हे स्वतः एमडी आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातील सल्लागार, यांनी एक पुस्तक लिहिले, who moved my cheese ? या नावाने ! बऱ्याच भाषांमध्ये भाषांतर झालय त्याच ! खरं म्हणजे ती अगदी छोटीशी बोधकथा आहे. त्यात तो उंदीर स्निफ आणि स्करी , आणि दोन माणसे, हेम आणि hoa. त्याचबरोबर चिझ . ही अदृश्य पात्र सगळी प्रतीक रूपाने आहेत. चीझ हे सत्ता यशप्राप्ती अपेक्षापूर्ती इप्सित यांचे प्रतीक आहे, ज्याच्यासाठी आपण धावत सुटतो. किंवा प्राप्त परिस्थितीत आपण सुख समाधान मानतो. उंदीर हे अतिसामान्य श्रमजीवी पोटभरू ,तर्कशास्त्र आणि बुद्धी यांचे पाठबळ नसणारे यांचे प्रतीक आहे. तर दोन माणसे म्हणजे बुद्धीच्या बळावर सतत अति विचार किंवा अविचार करण्यार्यांचे प्रतीक. खरं म्हणजे या सगळ्यांना त्यांचे त्यांचे चीझ मिळालाय. परंतु ते नाशवंत आहे. काल मानाचा त्याच्यावर परिणाम होणार आहे. अशा या बदलत्या स्थितीवर काहीच सुचत नाही, तेव्हा समस्या निर्माण होते. म्हणजेच चिझ शिळे होईल, त्याला वास येईल !

प्रत्यक्ष आयुष्यामध्येपण प्रश्नांची जागा बदलेल, बदलाची चाहूल घ्यायला लागेल, परिस्थितीप्रमाणे स्वतःबद्दल करण्याची मानसिकता ठेवावी लागेल, थोडक्यात बदलांना सामोरे जावे लागेल. सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे आत्मदया किंवा सेल्फ पिटी करणाऱ्या लोकांसाठी छान कथा आहे .अशाच एका आयटी कंपनीमध्ये एक मेल येतो. तो यांना नोटीस बोर्डावर दिसतो की तुमची प्रगती थांबवणाऱ्या अशा एका कर्मचाऱ्याचे काल निधन झाले. आणि त्याचे दर्शन घेता यावे म्हणून शेजारच्या हॉलमध्ये शवपेटी ठेवण्यात आली आहे .सहकार्याच्या मृत्यूचे दुःख सगळ्यांना झाले पण ही आपल्या प्रगतीला ,कंपनीला मारक ठरणारी व्यक्ती कोण ? याचीही उत्सुकता होती.

प्रत्येकाने जाऊन जेव्हा तिचे बघितले तेव्हा प्रत्येक जण चकित होत होता. शवपेटी मध्ये कोणीही नव्हते, होता फक्त एक आरसा ! यात प्रत्येकाला स्वतःचेच प्रतिबिंब दिसत होते. आणि बाजूला एक चिठ्ठी लिहून ठेवली होती,”तुमच्या सगळ्यांच्या समृद्ध होण्यामध्ये आडकाठी करण्याची क्षमता असणारी एकच व्यक्ती या जगात आहे, ती म्हणजे तुम्ही स्वतः ! ना तुमसे मित्र, ना पालक, ना जोडीदार ,ना कंपनी ! जेव्हा तुम्ही स्वतःला बदलवाल, स्वतःच्या मर्यादा जाणून, प्रश्नांना सामोरे जाऊन त्याच्याशी सामना कराल. अंड्याच्या प्रमाणे बाहेरून दाब पडल्यास फुटते, पण आतून दाब पडला अंड्यांतून जीव बाहेर येतो. त्याचप्रमाणे आपल्या आतून जे बाहेर येते ,आपल्या सृजनाचा ,कल्पनेचा ,आनंदाचा, अविष्कार जो असतो तोच चिरकाल असतो. त्याला आपण नाकारतो,दुसऱ्यावर blame करत , स्वतःला बिचारे म्हणवतो.”

लोकांना खाऊ घालण्याचा आनंद आतून घेणारी दीर्घायुषी अम्मा,स्वतःवर प्रेम करून,केसांच्या ग्रे शेड चा आनंद मिरवणाऱ्या महिला,जगण्याचे गणित समजावणाऱ्या व्यक्ती,बदलांना सामोरे जायला शिकवणारी कथा या सगळ्यात आनंद हा आतून आलेला आहे,तो खरा आहे ,तो हसणारा,हसवणारा आहे.

“ग्रेट थिंग्ज ऑल्वेज बिगीन फ्रॉम अवर इनसाईड !” एका आनंदी कावळ्याची गोष्ट आहे. कधीच दु:

खी न होणारा हा कावळा राजाच्या खूप डोळ्यात खुपायचा. मग पुर्ण प्रयत्नांनीशी राजाच्या कावळ्याला रडण्याचा दुःखी करण्याचा प्रयत्न करायचा, त्याला भाले टोचायचा, गरम पाण्यात ठेवायचा, उपासमार घडवायचा, तरीही कावळा आपला आनंदी ! शेवटी तो हताश होऊन कावळ्याला विचारतो, कसं काय रे जमवतो हे? माझे बघ, राजपुत्र ऐकत नाही , पक्ववांन बेचव होतात,राण्या सारख्या मागण्याच करत राहतात. तू कसा कुरकुरत नाही? त्यावर कावळा म्हणतो, अहो महाराज ! तुम्ही आनंद शोधता तो दुसऱ्याच्या वागण्यातून तुम्हाला मिळणारा… मग तो तुमच्या हातात कसा मिळणार ? मी आपला माझा माझाच खूष असतो. मग बाहेरची परिस्थिती माझा आनंद कसा हिरावून घेईल ?

फ्रेंडस् ! आनंद मोजता येत नाही आणि तो आपल्या आत असतो, त्यामुळे मी बिचारा/ बिचारी म्हटले नाही,तर आपणही गुणगुणू या,” मैने कहा फुलों से, हसो तो वो खिलखीलाके हस दिये …”

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button