” मै हू ना !” जणू एक फुंकर .

Main hu na!

या मूव्हीमध्ये शाहरुख खान(Sharukh Khan) आपल्या लहान भावाला ,झायेद खानला प्रत्येक वेळी पाठीवर थाप देऊन, “कीप इट अप ! मै हुं ना ! (“Main hu na!” )”मी आहे तुझ्याबरोबर असं सांगत असतो हे सगळ्यांना आठवत असेल.

“मी आहे ना ! “केवळ हे शब्द किती दिलासा देऊन जातात. खूप अर्थवाही शब्द आहेत हे. ती असते आपल्या दुखऱ्या मनावरची, जखमेवरची एक फुंकर ! फूऊ..! हे शब्द डोळ्यासमोर येताच आठवतात ते प्रेमळ डोळे, ती माया, ती ममता ,तो स्नेहसहवेदना आणि ती संवेदनशीलता आणि आईचं ते म्हणणार सहज सुंदर रूप ! बाळाला काहीतरी छोटे-मोठे लागलेलं असतं. आणि तिची ती फुंकर जादुई काम करते. मुल लगेच खेळायला लागतं. असं खेळता-खेळता दमलेल्या बाळाला आई आंघोळ घालते तेव्हा खूप भूक लागलेली असते त्याला .आणि मग आई दुध बशी मध्ये उठून परत एक हळुवार फुंकर घालून ते थंड करते. बाळाचे छोटे भावंडे येतं, त्या चुळबुळ करत खेळणाऱ्या बाळाच्या गालावर अलगद दादा फुंकर मारतो आणि छोट्या बाळाला एकदम हसू येतं. खेळत असताना डोळ्यात जर एखादे वेळी कचरा गेला, तर अलगद हातांनी आपलीच एखादी मैत्रीण डोळा उघडून अलगत फू.. करते. फ्रेंड्स ! हे फू .. म्हणणारे शब्द , मी आहे ना ! काळजी नको करू, असे म्हणणारे शब्द हरवतात आहे का ?

लहानपणी आठवतं आहे का, की खेळताना आपण पडायचो ,रडायचो, आणि मग रडत रडत आई किंवा घरातील वडील मंडळींकडे गेल्यावर ते आपल्याला ज्या वस्तू मुळे लागले त्या वस्तूला अलगत चापट मारून, “हात रे ! आमच्या बाळाला का मारतो रे ! “असं म्हणायचे. की आम्हाला वाटायचं,” अरे कोणीही आपल्याला काहीही केलं तरी त्याला रागवायला माझे आई-बाबा आहेत.” किमान काही चावलं आणि आपण आई-बाबांना दाखवलं तर ते लगेच फुंकर मारायचे आणि म्हणायचे आता काही होणार नाही , फू केले ना ,पटकन बरं होणार ! किंवा आपण पडलो झडलो, तर लगेच म्हणायचे ,अरे रे! तो बघ उंदीर पळाला.

फ्रेंड्स ! मानसशास्त्राच्या भाषेत बघितलं तर किंवा थोडं ज्ञानाच्या पातळीवर तासून बघितलं तर यात काही तथ्य नसेलही. किंवा आपण आता मोठे झाल्यामुळे तो एक बालिशपणा वाटत असेल कारण आपण आता खूप शहाणे झालेले आहोत, आपल्याला आता कुणाची गरज नाही असं आपल्याला वाटतं. बरेचदा असंही म्हटल्या जाते की उंबरठ्याला हात रे करून, आपल्या चुकीचे खापर आपण मुलाला दुसऱ्यांवर फोडायला शिकवतो. किंवा हात पाण्यात घातला आणि तो भाजला तर फू..! करून आपण त्याला वास्तवापासून दूर नेतो आहे किंवा विवेक शिकवत नाही आहे. असेही म्हटल्या जाते. एका वेगळ्या दृष्टीकोनाने ते बरोबर ही आहे. म्हणजे चार ,पाच वर्षाच्या पुढे आपण मुलांना जेव्हा “विवेक” शिकवायला लागतो,या सारख्या गोष्टी त्याला समजायला, लागतात. त्यावेळी हे ठीक आहे.

परंतु अगदी छोट्या मुलांना, एखाद्या गोष्टीपासून त्याचे लक्ष विचलित करण्यासाठी, त्याच्या झालेल्या दुखण्याला न गोंजारत, असा एखादा उंदीर पळाला सारखा उपाय योग्यच आहे. किंवा एखाद्या वस्तूला रागवणे, म्हणजे त्या बाळाला “मी सुरक्षित आहे “हे माहित करून देणे. ही पद्धत किती बरोबर आहे. कारण एका विशिष्ट वयापर्यंत प्रत्येक मुल आपल्या आई वडिलांवर अवलंबून असते. ही सुरक्षित वातावरणात झालेली वाढ मुलांना पुढे स्थैर्य प्राप्त करून देते.

असे प्रसंग फक्त लहानपणीच येतात असं नाही. माणूस जन्माला येतो तो एका असुरक्षित ,अनिश्चित जगात ! नशिबात असेल तर आई-वडिलांच्या अत्यंत सुरक्षाकवचात तो मोठा होतो .पण या जगात कोणत्याही गोष्टीची हमी देता येत नाही .कदाचित म्हणूनच जन्मापासून आश्वासक हातांची त्याला गरज हवी असते .थोडं मोठं होईपर्यंत तरी उत्तम कुटुंब, आपुलकी ,प्रेम देणारे नातेवाईक आणि संवेदनशील समाज ती गरज पूर्णही करत असतात. हळूहळू हे आधार मागणारे हातच ,आधार देणारे ही होत जातात. आयुष्याच्या प्रवासात खूप अडचणींना तोंड द्यावं लागतं ,माणूस त्रस्त होतो, वेदना ग्रस्त होतो ,खचून जातो. पण” काळजी नको करू ,मी आहे ना ! “हे शब्द सगळी ताकद गोळा करून संकटाला सामोरे जायची हिम्मत देतात. एक खूप अचाट अशी शक्ती आहे या शब्दांमध्ये ! आजच्या काळात तर माणसं खरं तर आसुसली असतात या शब्दांत करिता ! पण तरीही फू .. सारख्या बालीश वाटणाऱ्या शब्दांचे महत्त्व त्यांना कळत नाही.

अलीकडे लहान घरे आणि व्यक्तिस्वातंत्र्याची चुकीची कल्पना यामुळे एक प्रकारचा एकाकीपणा येत चाललेला आहे. समजत नाहीये पण हा “फू “दुर्मिळ होत चालला आहे. वयाने मोठ्या लोकांना सुद्धा त्यांच्या पेक्षा मोठ्या लोकांकडून मिळणारी ही “फू “ची मात्रा हवी असतेच .परंतु असा एक नवा ट्रेण्ड रुजू होतो आहे की माणसाला खरं तर कोणाचीच गरज पडत नाही तो येतोही एकटा ,जातोही एकटा ! मग लोकं कशाला हवेत ? पण काही प्रसंग असेही येतात की त्या एका फुंकरीची क्षणभर तरी गरज लागते. नंतरचे सगळे आपले आपणच मॅनेज करणार असतो. पण एक सुरक्षा कवच, ती एक फुंकर, पाठीवर मारलेली थाप, कितीही कर्तुत्ववान माणूस असू दे ,पण हळव्या प्रसंगी प्रेमाचा एक हात पाठीवर फिरला तर तो त्याला खूप हवाहवासा वाटतो ! ती असते एक प्रेरणा .एक moral support. मायेच्या पंखाखालचे हे उबदार पांघरूण हे या सपोर्ट सिस्टीम मुळेच आपल्याला मिळत असत. आणि माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला कधीनाकधी याची गरज भासतेच. जे केवळ सांत्वन नसते, तर दुःख विसरून, जखमांचा विसर पाडून परत उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे हे प्रेम आणि विश्वासदायक स्पर्श असतो.

ही एक प्रेरणा असते. आणि प्रत्येकाला गरजेचे असते. काही लोक अंतर्गत रित्या motivate होतात. पण बहुतांशी लोकांना ह्या बाहेरून मिळणार्या मोटिवेशनची गरज असतेच. संसारातील अनेक व्याप ताप, जखमा, हे सगळं होत असताना सहानुभूतीच्या हळुवार शब्दांनी ते सुसह्य होतं. जवळच्या व्यक्तीचा झालेल्या मृत्यूचे दुःख भोगणे कितीही कठीण भयंकर असले तरी ते अटळ असते. अशा वेळी कोणी मायेने पाठीवर हात फिरवून दुःखावर फुंकर घालत,” मी आहे ना !” हा फक्त शब्दांशिवाय केलेला संवाद पुरेसा असतोच ना !

एका कंपनीत काम करणाऱ्या एका कामगाराला अपघात होऊन त्याचे डोळे गमवावे लागले. मुले लहान होती. स्वतःचे घर नव्हते, घरातला एकमेव कर्ता पुरुष ! डॉक्टरांनी उपाय नसल्याचे स्पष्ट सांगितल्यामुळे त्याच्या बायकोला चांगलाच धक्का बसला. परंतु ती ताबडतोब सावरली आणि तिने नवऱ्याला सांगितले,” तुम्ही चिंता करू नका . मी आहे ना !”या शब्दांनी तो कामगार सावरला आणि आज यशस्वी जीवन जगतोय , नवीन जीवनाशी त्यांनी जुळवून घेऊन ते आनंदात आहेत. मोठा आजार असलेल्या रुग्णांना, आपत्तीत सापडलेल्या मित्रांना हे सांगण्याची गरज असते. कुटुंबापासून सुरू झालेले हे वर्तुळ समाजापर्यंत विस्तारित होत जाते.

एवढेच काय सामाजिक जीवनातही त्याची गरज लागतेच .भगिनी निवेदिता यांनी विवेकानंद यांच्या प्रेरणेने इंग्लंड सोडून पूर्ण वेळ भारतात येऊन काम करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळेला स्वामीजी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. यांना पाठवलेल्या पत्रात विवेकानंद लिहितात की ,”यात उडी घेण्यापूर्वी तुम्ही नीट विचार करणे आवश्यक आहे. तुम्हाला जर या कार्यात अपयश आलं किंवा कार्याचा उबग आला, तर मी आमरण तुमच्या पाठीशी राहीन एवढे मी तुम्हाला निश्चित सांगतो, मग तुम्ही भारतासाठी कार्य करीत असा किंवा नसा, वेदांत मानीत असा किंवा नसा. हत्तीचे सुळे एकदा बाहेर आले म्हणजे पुन्हा काही आज जात नाही. त्याचप्रमाणे खऱ्या पुरुषाच्या तोंडून एकदा शब्द बाहेर पडले म्हणजे ते तो मागे कधीही घेत नाही माझे हे तुम्हाला अभिवचन आहे.”

सुदैवाने आपल्याकडे कुटुंब ही एक चांगली सपोर्ट सिस्टिम आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या आजारांसाठी वेगवेगळ्या सपोर्ट सिस्टीम म्हणजे ग्रुप सर्वत्र चालतात. साधं उदाहरण बघितलं तर आज कुठलाही फंक्शन एकट्याने करायचा म्हटला तर अवघड जातं. सगळे श्रम पैशाने विकत घेता येतात. पण अशावेळी ,”काही लागलं तर सांग ग ! “एवढे म्हणणारी, शेजारीण किंवा मैत्रिण लागतेच. सगळ्या गोष्टी करणार आपणच असतो, पण ही हक्काची जागा मनाला शांतता देते. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला ,कधी ना कधी ,या “फू” ची गरज पडते ! मै हु ना म्हणणारा व्यक्ती लागतोच! प्रत्येकालाच तो मिळेलच असे नाही. म्हणून आपल्या पायावर आपण ठाम उभं राहायचं असतं आणि जन्माला आपल्याला ज्याने घातले तो परमेश्वर , आपल्याला निराधार ठेवत नाही हा विश्वास बाळगून निर्भयपणे लढा द्यायचा असतो.
फ्रेंड्स ! तेव्हा निश्चिंतपणे पुढे पाऊल टाका ! मै हू ना !

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER