‘मैदान’ आणि ‘आरआरआर’मध्ये होणार टक्कर

‘Maidan’ and ‘RRR’ will clash

प्रख्यात दिग्दर्शक एस. एस. राजामौलीने जेव्हापासून ‘आरआरआर’ (RRR) सिनेमाची घोषणा केली होती, तेव्हापासून प्रेक्षक या बहुचर्चित आणि मल्टीस्टारर सिनेमाच्या रिलीज डेटची वाट पाहात होते. सोमवारी राजामौलीने या सिनेमाची डेट जाहीर केली. हा सिनेमा दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजे १३ ऑक्टोबर २०२१ ला रिलीज केला जाणार आहे. विशेष म्हणजे अजय देवगणचा (Ajay Devgan) बहुचर्चित आणि गेल्या वर्षी प्रदर्शित होऊ न शकलेला खेळावर आधारित ‘मैदान’ (Maidan) सिनेमाही दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजे १५ ऑक्टोबरला रिलीज करणार असल्याचे घोषित केले आहे. खरे तर अजयने अगोदर स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधत ११ ऑगस्टला सिनेमा रिलीज करण्याचे ठरवले होते. परंतु त्यावेळी दुसरे मोठे सिनेमे येणार असल्याने त्याने सिनेमा आणखी दोन महिने पुढे ढकलला होता. पण आता राजामौलीने अजयच्या सिनेमाला टक्कर देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे राजामौलीच्या या सिनेमात अजय देवगणही महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

निर्मात्यांनी दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर (Social Media) एक पोस्ट टाकून सोमवारी दुपारी २ वाजता एक महत्त्वाची घोषणा करणार असल्याचे म्हटले होते. तेव्हाच या सिनेमाच्या रिलीजची तारीख जाहीर केली जाणार असल्याचे म्हटले जात होते. सोमवारी तसेच झाले. राजामौलीने सोशल मीडियावर आरआरआरचे पोस्टर रिलीज करून ‘या १३ ऑक्टोबरला आग आणि पाणी एकत्र येणार असून त्याचे साक्षीदार व्हा. या अशा दोन शक्ती आहेत ज्या यापूर्वी कधीही एकत्र आलेल्या नाहीत. भारतीय सिनेमा जगतातील एक अविस्मरणीय अनुभव.’ असे म्हटले आहे. एसएस राजामौलीच्या ‘आरआरआर’ या सिनेमात राम चरण, ज्युनिअर एनटीआर, अजय देवगण आणि आलिया भट्ट काम करीत आहेत. हा सिनेमा तामिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि हिंदीमध्ये संपूर्ण भारतात रिलीज केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER