राजगडावर सापडला चोर दरवाजा

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) निर्माण केलेल्या रयतेच्या स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्याची पहिली राजधानी राहिलेल्या राजगडावर नुकताच एक चोर दरवाजा सापडला आहे. गडाच्या पाली दरवाजाच्या सुरक्षिततेसाठी असणाऱ्या बुरुजात अनेक वर्षे हा दरवाजा दगड-मातीने पूर्णपणे मुजला होता. सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्रच्या मावळ्यांनी हा चोर दरवाजा पूर्ववत खुला केला.

स्वराज्याचा प्राथमिक कारभार तब्बल २५ वर्षे शिवछत्रपतींनी राजगडावरून चालवला. राजगडाचा राजमार्ग राहिलेल्या पाली दरवाजाच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या भक्कम बुरुजात असणारा छोटेखानी चोर दरवाजा कालौघात पूर्णपणे मुजला होता. बुरुजाच्या ७ ते ८ मोठ्या दगडांनी व मातीने तो झाकून गेला होता. गडाचे बारकाईने निरीक्षण करणाऱ्या सह्याद्रीच्या मावळ्यांना तो दिसला. मग काय, दुर्गसेवक मावळ्यांनी दगड-माती बाहेर काढून दरवाजा तत्काळ पूर्ववत खुला केला.

दरबाजाची उंची ३फूट आणि रुंदी २ फूट असून, त्याला केवळ दोन टप्पे आहेत. तेथून खाली उतरण्यासाठी किमान दोन ठिकाणी दोरखंडाचा वापर केला जात होता. मोहिमेत सह्याद्री प्रतिष्ठान पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या मावळ्यांचा सहभाग होता. हा दरवाजा प्रथमच प्रकाशात आल्याची माहिती दुर्ग अभ्यासक प्र. के. घाणेकर, मिलिंद पराडकर, राहुल नलावडे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER