
काही महिन्यांपासून लडाख बॉर्डरवर चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये चकमकी घडत आलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत भारताने चीनच्या काही सैनिकांना यमसदनी धाडले होते. त्यानतंर चीनने पुन्हा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जो भारतीय सैनिकांनी हाणून पाडला होता. त्यानंतर मात्र चीन आणि भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांनी चर्चा करून चीनने आता पाऊल मागे घेण्यास सुरुवात केली आहे. भारताकडून असा कडवा प्रतिकार होईल याची कल्पनाही चीनने केली नव्हती. मात्र भारतीय सैन्याने चीनला अस्मान दाखवले आणि भारतीय सैन्याची ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली.
यापूर्वी चीनने भारतावर आक्रमण करून भारताचा भूभाग बळकावला होता. 1962 मध्येही चीनने असेच भारतावर आक्रमण केले होते आणि त्यावेळी 2 हजार चीनी सैनिकांना आपल्या केवळ 125 सैनिकांनी रोखले होते. 60 वर्षांपूर्वीच्या भारतीय सैन्याची शौर्याची ही गाथा आता प्रख्यात दिग्दर्शक महेश मांजरेकर एक वेबसीरीज घेऊन आला असून ही वेबसीरीज डिझ्नी हॉटस्टारवर रिलीज केली जाणार आहे. 10 एपिसोडची ही वेब सीरीज असून याचे लिखाण चारुदत्त आचार्य यांनी केले आहे. ‘1962: दि वॉर इन दि हिल्स’ (1962: The War in the Hills)या नावाने तयार झालेल्या या वेबसीरीजमध्ये संख्या आणि शस्त्रे कमी असतानाही भारतीय छावणीत घुसखोरी करणा-या चीनी सैन्याला भारतीय सैनिकांनी कसे थांबवले ते दाखवण्यात आले आहे. भारतीय सैनिकांचा लष्करी इतिहासामधील सर्वात मोठा लढा ठरला होता.
दिग्दर्शक महेश मांजरेकरने या वेबसीरीजबाबत माहिती देताना सांगितले, ‘१९६२: दि वॉर इन दि हिल्स’ ही वेबसीरीज विस्मृतीत गेलेल्या इतिहासाच्या एका प्रकरणाला पुन्हा उजाळा देणारी आहे. सत्य घटनांनी प्रेरित ही कथा १२५ सैनिकांचा प्रवास दाखवणारी आहे. ही कथा फक्त रणांगणापर्यंत मर्यादित ठेवलेली नसून या सैनिकांचे त्यांच्या कुटुंबावरील प्रेम, कुटुंबापासून दूर राहणे आणि मृत्यू अशा गोष्टींचा सामना करणा-या सैनिकांचे वेगळे जीवनही दाखवणारी आहे.” ‘पायरेट्स ऑफ दि कॅरेबियन’,’स्टार ट्रेक बियॉण्ड’ या भव्य फ्रँचायजीचे अॅक्शन दिग्दर्शन केलेले जगप्रसिद्ध अॅक्शन कोरिओग्राफर डॉन ली यांनी या सिरीजमधील सर्व अॅक्शन सीक्वेन्सचे दिग्दर्शन केले आहे. लडाखमधील डोंगराळ प्रदेश आणि दुर्गम गावांमध्ये या वेबसिरीजचे शूटिंग करण्यात आले आहे अशी माहितीही महेशने दिली.
या वेबसीरीजमध्ये अभय देओलने लहान बटालियन ‘सी कंपनी’चा लीडर मेजर सूरज सिंहची भूमिका साकारली आहे. त्याच्यासोबत सत्या मांजरेकर, आकाश ठोसर, सुमीत व्यास, रोित गंदोत्रा, अनुप सोनी, मयंग चँग, माही गिल, रोशेल राव, हेमल इंगळे यांनीही भूमिका साकारल्या आहेत. अभय देओलने सांगितले, ‘सत्य कथानकावर आधारित या वेबसीरीजमध्ये मेजर सुरज सिंह यांची भूमिका साकारणे हे माझ्यासाठी आव्हान होते. त्यांनी शौर्य दाखवून शेवटपर्यंत त्यांच्या तुकडीचे नेतृत्व केले होते. ते एक शूर वीर तर होतेच, तसेच एक वडिल व पती म्हणूनही ते तितकेच प्रभावशाली होते. त्यांच्या शौर्याची ही एक असाधारण कथा आहे. माझे भाग्य आहे की मला ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली. मी या भूमिकेला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.”
हितेश मोडक यांनी या वेबसीरीजसाठी 7 गाणी संगीतबद्ध केली असून सुखविंदर सिंह, विजय प्रकाश, सलमान अली, शैलय बिडवायकर आणि शहाजान मुजीब यांनी ही गाणी गायली आहेत..26 फेब्रुवारीपासून ही वेबसीरीज डिझ्नी हॉटस्टारवर प्रसारित केली जाणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला