महेश मांजरेकरने पूर्ण केले ‘द पॉवर’चे शूटिंग

Mahesh Manjrekar - The Power

महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) सलमान खानसोबत (Salman Khan) अंतिम सिनेमाच्या निर्मितीत आता व्यस्त झाला आहे. प्रवीण तरडेच्या ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी सिनेमाची ‘अंतिम’ ही रिमेक असून यात सलमानच्या बहिणीचा अलविराचा पति आयुष शर्मा नायकाची भूमिका साकारीत आहे. तर सलमान खान पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच या सिनेमाचे शूटिंग सुरु झाले आहे. मात्र हे शूटिंग सुरु करण्यापूर्वी महेशने त्याच्या अर्धवट राहिलेल्या ‘द पॉवर’ सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आणि नंतरच अंतिमचे शूटिंग सुरु केले आहे.

द पॉवर हा साऊथच्या एका सिनेमाची रिमेक असून यात विद्युत जमवाल (Vidyut Jammwal) आणि श्रृती हसन (Shruti Haasan) नायक-नायिकेच्या भूमिकेत आहेत. जवळ जवळ एक दशकानंतर महेश मांजरेकर पुन्हा एकदा बॉलिवुडमध्ये दिग्दर्शक म्हणून या सिनेमामुळे प्रेक्षकांसमोर येत आहे. महेशने दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट होता ‘सिटी ऑफ गोल्ड’ जो 2010 मध्ये रिलीज झाला होता. ‘द पॉवर’ या सिनेमाचे शूटिंग अत्यंत गुपचुपरित्या पूर्ण करण्यात आले. सिनेमाबाबत कसलीही माहिती बाहेर येऊ दिली नव्हती. महेशच्या शैलीला साजेसाच म्हणजे हा सिनेमाही एक गँगस्टर ड्रामा आहे. विद्युत जमवाल यात एका गँगस्टरची भूमिका साकारीत आहे. 2018 च्या एप्रिलमध्ये या सिनेमाला सुरुवात करण्यात आली होती. पुढील वर्षी ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे.

चित्रपटाची निर्मिती विजय गालानी यांनी केली आहे. विजय गालानी यांनी सांगितले, थिएटर आता सुरु झाले असले तरी मोठ्या सिनेमांची रांग लागलेली असल्याने आम्ही ओटीटीवर हा सिनेमा रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. ओटीटीमुळे थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ न शकणाऱ्या सिनेमांना प्रेक्षकांसमोर येण्याचा एक मार्ग मिळाला आहे. या सिनेमात मोठ्या प्रमाणावर अॅक्शन असून एक-दोन नव्हे तर तब्बल 18 व्हिलन आहेत. त्यामुळे सिनेमाच्या पोस्ट प्रॉडक्शनला खूप वेळ लागला आणि म्हणून सिनेमा प्रदर्शित होण्यास उशीर झाला. खरे तर आम्ही जून-जुलैमध्ये हा सिनेमा रिलीज करणार होता पण कोरोनामुळे थिएटर बंद झाल्याने आम्ही रिलीज करू शकलो नाही. पण आता ओटीटीवर हा सिनेमा रिलीज होत असल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे असेही विजय गालानी यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER