महेश बाबूने उपचारासाठी आर्थिक मदत करून लहान मुलाचे वाचवले प्राण

mahesh Babu

कलाकार नेहमी समाजातील आर्थिक वंचित घटकांना मदत करीत असतात. काही कलाकार गपचुप अशी मदत करत असतात. त्यांची ही मदत कर्तव्यभावनेने असल्याने ते याचा प्रचार करीत नाहीत. तर दुसरीकडे काही कलाकार बोटभर मदत करतात पण प्रचार मात्र हातभर मदत केल्याचा करतात. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी मागे याबाबत बोलताना सांगितले होते. आम्ही मदत करतो ती प्रचारासाठी करीत नाही तर सामाजिक भावनेतून करतो. त्यामुळे त्याची घोषणा करीत नाही. परंतु त्याचा अर्थ असा नाही की आम्ही समाजाप्रती असलेले आमचे देणे चुकवत नाही. अमिताभचे हे म्हणणे 100 टक्के खरे आहे. अनेक कलाकार पडद्यामागे राहून मदत करीत असतात. बॉलिवूडप्रमाणे साऊथचे कलाकारही मदत करण्यात अग्रेसर असतात, प्रख्यात अभिनेता महेश बाबूही (Mahesh Babu) लहान मुलांच्या उपचारासाठी मदत करीत असतो. मात्र त्याचा प्रचार करीत नाही. यावेळी मात्र त्याच्या पत्नीने नम्रता शिरोडकरने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिल्याने त्याच्या या मदतीची माहिती लोकांना झाली. नम्रताची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

अभिनेता महेश बाबूने आंध्र प्रदेशमधील विविध हॉस्पिटलशी करार केला असून या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या गरीब मुलांच्या उपचारांचा खर्च महेश बाबू उचलत असतो. त्याच्या या मदतीमुळे नुकतेच एका मुलाचे प्राण वाचले. नम्रता शिरोडकरने (Namrata Shirodkar) याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे. नम्रता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. पती आणि मुलांसोबतचे फोटो, व्हीडियो ती सोशल मीडियावर पोस्ट करीत असते. तिने नव्या पोस्टसोबत एक फोटोही टाकला असून यात एक दांपत्य त्यांच्या लहान मुलाला घेऊन उभे असल्याचे दिसत आहे. फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये नम्रताने लिहिले आहे, ‘मनाला स्पर्श करणारी लहान मूल बरे होण्याची आणखी एक गोष्ट. व्हीएसडी आणि पीडीएचे ऑपरेशन झालेल्या अंकित भार्गवला हॉस्पिटलमधून सुट्टी दिल्याची माहिती मिळाल्यानंतर खूपच आनंद झाला. त्याची प्रकृती आता चांगलीच सुधारत आहे. त्याची प्रकृती लवकरात लवकर चांगली व्हावी अशी मी प्रार्थना करते.’

नम्रता शिरोडकरची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून महेश बाबूचे प्रशंसक या पोस्टवर प्रतिक्रियांचा पाऊस पाडून महेश बाबूची प्रशंसा करीत आहेत. महेश बाबू सध्या त्याचा नवा सिनेमा ‘मेजर’साठी चर्चेत आहे. 26-11 ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावरील हा सिनेमा असून हा सिनेमा 2 जुलै 2021 रोजी रिलीज केला जाणार आहे. हिंदी आणि तेलुगुत तयार होणाऱ्या या सिनेमात अदिवी शेष मेजर उन्नीकृष्णनची भूमिका करीत असून याचे दिग्दर्शन शशी किरण टिक्का करीत आहे. महेश बाबू सध्या या सिनेमाच्या निर्मितीत बिझी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER