26-11 चे हीरो मेजर उन्नीकृष्ण यांच्या जीवनावर महेश बाबू आणि सोनी पिक्चर्स बनवतायत चित्रपट

Adivi Sesh - Major

2008 च्या 26 नोव्हेंबर रोजी मुंबईकरांसाठी काळ रात्र ठरली होती. दहा दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला करून संपूर्ण देशाला वेठीस धरले होते. दहशतवाद्यांचा मुकाबला करताना आपले अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी हुतात्मा झाले होते. केवळ पोलिसच नव्हे तर सैन्य दलातील अधिकाऱ्यांनाही दहशतवाद्यांचा खात्मा करताना वीरमरण आले होते. यापैकीच एक होते मेजर संदीप उन्नीकृष्णन (Sandeep Unnikrishnan). ताज हॉटेलमधील दहशतवाद्यांचा खात्मा करताना त्यांना वीरमरण आले होते. परंतु दहशतवाद्यांच्या गोळ्या झेलत असतानाही त्यांनी हॉटेलमधील लोकांचे प्राण वाचवले होते. मेजर संदीप उन्नीकृष्णन यांचे हे अतुलनीय शौर्य पडद्यावर आणले जाणार आहे.

दक्षिणेतील सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) त्याच्या जीएमबी एंटरटेनमेंट, ए एस मूव्हीज आणि सोनी पिक्चर्स फिल्म्स इंडिया द्वारा निर्मित ‘मेजर’ नाव असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन शशी किरण टिक्का करीत असून अदिवी शेष मेजर उन्नीकृष्णन यांची भूमिका साकारीत आहे. चित्रपटात शोभिता धूलिपाला आणि सई मांजरेकरही दिसणार आहे. हिंदी और तेलुगु भाषेत तयार होणारा हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित करण्याचा महेश बाबूचा विचार आहे. 27 नोव्हेंबर रोजी मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या पुण्यतिथिनिमित्त ‘मेजर’ चित्रपटाच्या टीमने मेजर उन्नीकृष्णन यांना एका व्हीडियोच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली.

अभिनेता अदिवी शेषने (Adivi Sesh) त्याच्या भूमिकेबाबत बोलताना सांगितले, “जेव्हा मी पहिल्यांदा मेजर संदीप यांचे वडिल उन्नीकृष्णन यांना फोन करून चित्रपटाबाबत सांगितले तेव्हा प्रथम त्यांचा विश्वास बसला नाही. गेल्या दहा वर्षांपासून मेजर संदीप यांच्या जीवनावर संशोधन करून अमेरिकेत राहाणारा हैदराबादमधील एक दक्षिण भारतीय मुलगा भारतात येऊन मेजर संदीप यांच्या जीवनावर चित्रपट बनवत असेल यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. परंतु आम्ही त्यांना चार-पाच वेळा भेटलो तेव्हा त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला चित्रपट तयार करण्याची परवानगी दिली.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER