महायुतीचा घटक रिपब्लिकन पक्षाला ६ जागा निश्चित : रामदास आठवले

ramdas athavale

मुंबई :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी मागील तीन दिवस झालेल्या सलग चर्चेत आज अंतिम निर्णय होऊन भाजप शिवसेना महायुतीचा घटक म्हणून रिपब्लिकन पक्षाला विधानसभेच्या ६ जागा अधिकृत सोडण्यात आल्या आहेत.

सातारा जिल्ह्यातील फलटण, सोलापुरातील माळशिरस, विदर्भात भंडारा, मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यातील नायगाव, परभणी जिल्ह्यातील पाथरी तसेच मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर या ६ जागा रिपाइं ला सोडण्यात आल्या असल्याची अधिकृत घोषणा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बांद्रा येथील संविधान निवासस्थानी पत्रकार परिषदेत केली आहे.

माळशिरसची जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवाराचे नाव निश्चित करण्याचा निर्णय विजय सिंह मोहिते पाटील घेणार आहेत. मात्र त्यांनी माळशिरसमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी निश्चित करावी तसे होणार नसेल तर माळशिरसची जागा बदलून पुणे कॅन्टोन्मेंट ही जागा देण्यात यावी अशी सूचना आज आठवले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केली आहे.

काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजप शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहेत. रिपाइंसाठी आनंदाची बाब म्हणजे भाजप मधील काही कार्यकर्ते रिपब्लिकन पक्षात प्रवेश करीत आहेत. त्यानुसार नांदेडमधील भाजपचे नेते राजेश पवार यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला असून त्यांना रिपब्लिकन पक्षाची अधिकृत उमेदवारी नायगाव विधानसभा मतदारसंघातून दिली आहे. तसेच परभणीचे भाजप नेते आमदार मोहन फड यांनी रिपाइंमध्ये प्रवेश केला असून त्यांना रिपब्लिकन पक्षाची अधिकृत उमेदवारी पाथरी विधानसभा मतदारसंघातून देण्यात आली आहे.

मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघ शिवसेनेच्या कोट्यात आहे तरी शिवसेनेने सामाजिक दृष्ट्या विचार करून ती जागा रिपाइंला सोडायला हवी. याबाबत शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघ रिपाइंला सोडण्यात आला असून शिवसेनेच्या उमेदवाराला उमेदवारी मागे घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचे आश्वासन दिले आहे. रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून रिपाइंचे अधिकृत उमेदवार असल्याचे आठवले म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी आज झालेल्या चर्चेत रिपब्लिकन पक्षातर्फे सत्तेत वाटा मिळावा यासाठी काही प्रस्ताव सादर केले आहेत. त्यावर सरकार निवडून आल्यावर रिपब्लिकन पक्षाला सत्तेतील वाटा देऊन योग्य न्याय देऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असेही आठवले यांनी यावेळी सांगितले.