आमदारांचे पक्षांतर खरेच होणार की अफवा?

Mahavikas Aghadi

शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी मध्यंतरी एक बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न केला. भाजपचे ४० आमदार महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) संपर्कात असल्याचे पिल्लू त्यांनी सोडून दिले. लोकांनी त्याला प्रसिद्धी दिली. मुळात बच्चू कडू यांचे राजकीय अस्तित्व किती मोठे? संघटनावजा त्यांचा पक्ष किती मोठा? त्यांना महत्त्व तरी किती द्यायचे याचा विचार चॅनेल आणि पेपरवाल्यांनी करायला हवा होता? महाविकास आघाडीचे सरकार येण्यापूर्वी कडू हे भाजपच्या आणि विशेषत: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या संपर्कात होते. भाजप-शिवसेना आघाडीचे सरकार आले असते तर कडू त्यातही दिसले असत. साधारणत: अपक्ष निवडून आलेल्या आमदारांचा पवित्रा ‘जिधर दम उधर हम’ असा असतो. महाविकास आघाडीचे सरकार येताना दिसताच बरेच अपक्ष आमदार मातोश्रीवर जमा झाले होते.

आता कडू यांना ४० आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचा साक्षात्कार कुठून झाला कोण जाणे? उद्या खरेच हे ४० आमदार पक्षांतर करणार असतील तर ते आघाडी सरकारमधील तीनपैकी एका पक्षात जातील, पण हा पक्ष कोणता हे कडू यांनी सांगितले नाही. कडू यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एक पुडी सोडून दिली आहे. महत्त्वाचे मंत्रिपद मिळू न शकल्याने नवाब मलिक यांच्याकडे भरपूर वेळ सध्या आहे. त्यामुळे त्यांना असे साक्षात्कार होत असावेत. निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांची लवकरच घरवापसी होणार असल्याचा दावा त्यांनी केला आणि हे आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

नवाब मलिक यांना सध्याच्या राजकीय परिस्थितीचे निट आकलन झालेले दिसत नाही. महाविकास आघाडी सरकार ही बुडती नाव आहे आणि तीन पक्षांच्या या सरकारमध्ये समन्वयाचा दूर दूर पत्ता नाही. शिवसेनेत आतल्याआत संघर्ष सुरूच आहे आज तो छुपा आहे एवढेच. युवराज विरुद्ध पक्षातील जुनेजाणते लोक अशा या संघर्षाचा कधीही स्फोट होऊ शकतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यातील दुवा म्हणून काम करणारे खासदार संजय राऊत यांचे वाढते प्रस्थ हा देखील अनेकांना खटकणारा विषय आहे.

राष्ट्रवादीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांच्या समर्थक आमदारांची ताकद आजही आहे. काँग्रेसमधील मतभेद लपून राहिलेले नाहीत. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात विरुद्ध सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यात शहकाटशह सुरूच असतो. पवार कुटुंबात पूर्वीसारखे सख्य राहिलेले नाही ही बाब वरचेवर चर्चेत असतेच. अशावेळी राष्ट्रवादीत जाऊन कोणी पायावर धोंडा का पाडून घेईल? राजकारणी हुशार असतात. भाजपची राज्यात सत्ता नसली तरी केंद्रात सत्ता आहे, त्या पक्षाकडे नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीसांसारखे नेतृत्व केंद्र-राज्यात आहे.कधीही कोणताही चमत्कार करण्याची ताकद भाजपच्या नेतृत्वात आहे. मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्यासारखे पॉवरफुल मुख्यमंत्री असताना आॅपरेशन लोटस झाले. त्या आधी कर्नाटकातही झाले, उद्या महाराष्ट्राचा नंबर कधीही लागू शकतो अशी उघड चर्चा सध्या सुरू आहे. अशा परिस्थितीत भाजपचा एकही आमदार राष्ट्रवादीच्या गळाला लागण्याची शक्यता नाही. त्यामुळे बच्चू कडू असतो की नवाब मलिक अशांचे दावे फारसे गांभीर्याने घेण्याची परिस्थिती नाही. आता अशा अफवा पसरविल्या जात असताना दिल्लीतील एका आघाडीच्या दैनिकाने  दोन दिवसांपूर्वी एक बातमी दिली आहे ती अशी की राष्ट्रवादीचे १२ आमदार भाजपच्या संपर्कात असून ते कधीही भाजपत प्रवेश करू शकतात. याचा अर्थ अफवा दोन्ही बाजूंनी आहेत. ते काहीही असू द्या एकच सांगतो, महाराष्ट्रातील ऑपरेशन लोट्सची तयारी दिल्लीत सुरू झाली आहे. यावेळी कुठलीही घिसाडघाई करायची नाही, एकच दणका द्यायचा अशी रणनीती आखली जातेय… तूर्त एवढेच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER