महाविकास आघाडी मुंबई मनपाची निवडणूक एकत्र लढणार : नवाब मलिक

Nawab Malik

मुंबई :- मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप यांनी काँग्रेस मुंबई मनपाची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. तर महाआघाडीतील राष्ट्रवादीचे नेते अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले की, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढणार हे ठरले आहे. सर्वांनी एकत्र येऊन कामं करावी, असा प्रयत्न आहे.

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस युवक कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांच्या विक्रोळी पार्कसाईट येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात मलिक म्हणाले की, “फेब्रुवारीपासून आम्ही पक्षबांधणीच्या कामाला सुरुवात केली होती. त्यासाठी सभा सुरू झाल्या होत्या; परंतु कोरोनामुळे (Corona) त्या थांबल्या. या सभा आणि बैठका आता पुन्हा सुरू झाल्या आहेत.  आज नितीन देशमुख यांच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले. महाविकास आघाडी मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढणार हे ठरले आहे. काँग्रेसने मनपाची निवडणूक स्वबळावर लढावी या भाई जगताप यांनी मांडलेल्या भूमिकेबद्दल मलिक म्हणाले की, आमची भूमिका एकत्र लढायची आहे, मुख्यमंत्र्यांनीही तसे स्पष्ट केले आहे.

काही लोकांचे वैयक्तिक मत वेगळे असू शकते. मात्र, काँग्रेसची अधिकृत भूमिका अजून जाहीर झालेली नाही. महाविकास आघाडीने मुंबई महापालिका निवडणुकीबाबतचा कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरवलेला नाही, त्याबाबत बैठकच झालेली नाही.

नसीम खान यांचाही स्वबळाचा नारा

काँग्रेसचे दुसरे नेते नसीम खान यांनीही मुंबई मनपाच्या सर्व २२७ जागांवर आम्ही निवडणूक लढणार असे म्हटले आहे. काँग्रेस विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढेल. अनेक वर्षांपासून शिवसेना आणि भाजपाकडे महापालिकेची सत्ता होती. त्यामुळे रखडलेल्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणारच. राज्य सरकारमध्ये काँग्रेसच्या आमदारांचे प्रश्न मार्गी लागत नाही. त्यांना निधी मिळत नाही, ही गोष्ट खरी आहे. त्यामुळेच सोनिया गांधींना (Sonia Gandhi) हस्तक्षेप करावा लागला. मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. मला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे, असे खान यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER