मराठा समाजाची नाराजी दूर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय ; मिळणार EWS चा लाभ

CM Uddhav Thackeray

मुंबई : आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे नाराज झालेल्या मराठा समाजासाठी महाविकासआघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या आरक्षणाचा (EWS) लाभ देण्यात येणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय –

सामान्य प्रशासन

एसईबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षणाचा लाभ शैक्षणिक प्रवेश, व सेवाभरतीसाठी देणार

गृह/राज्य उत्पादन शुल्क विभाग

कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन काळात राज्यातील परवानाधारक (अनुज्ञप्ती) मद्यविक्रीची दुकाने बंद होती. या बंद असलेल्या दुकानांचे परवाना (अनुज्ञप्ती )शुल्कात सूट देण्याची मागणी होती. त्यानुसार या परवानाधारक मद्यविक्रेत्यांना हे शुल्क भरण्यास सूट देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

अन्न, पुरवठा व ग्रा.संरक्षण विभाग

लक्ष्यनिर्थारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा तसेच यंत्रणेचे बळकटीकरण करुन अन्नधान्याची वाहतूक शिधावाटप दुकानांपर्यंत थेट करण्यासाठी धोरण निश्चित करण्यास मान्यता.

अन्न, पुरवठा व ग्रा.संरक्षण विभाग

पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदूळ (Fortified Rice) वितरणाची केंद्र सहाय्यित योजना संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर राबविण्यास मंजुरी देण्यात आली. कुपोषणाचे (एनिमिया) प्रमाण कमी करण्यासाठीची ही योजना राज्याच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत राबविण्यात येणार.

कौशल्य विकास व उद्योजकता विभाग

राज्यातील ५३ शासकीय तंत्र माध्यमिक शाळा/केंद्र तथा कनिष्ठ महाविद्यालयातील +२ स्तरावरील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमांचे (HSC Vocational) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिल्प कारागिर प्रशिक्षण योजनेतंर्गत व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये रुपांतर करण्यास मान्यता .

पशुसंवर्धन, दुग्ध विकास विभाग

‌राष्ट्रीय सहकार विकास निगम पुरस्कृत योजनेतील कुक्कुट पालन सहकारी संस्थांची थकबाकी प्रथम एक मुस्त करार (वन टाईम सेटलमेंट) पध्दतीने भरण्यास मंत्रिमंडळाची मान्यता.

शालेय शिक्षण विभाग

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस

सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्त्री शिक्षणातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे योगदान आणि त्यांचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचविणे गरजेचे असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

या दिवशी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत शाळांमध्ये भाषणे, निबंध, वत्कृत्व, परिसंवाद व एकांकिकांचे आयोजन करण्यात येईल.

सार्वजनिक बांधकाम विभाग

राज्यातील प्राचीन मंदिराचे जतन व संवर्धन करणार

राज्यतील प्राचीन मंदिरांचे जतन व संवर्धन करण्याच्या निर्णयास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आलेली आहे. याबाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात घोषणा केली होती.

महाराष्ट्र राज्य हा जसा गडकिल्ल्यांसाठी ओळखला जातो तसाच संतांची भूमी म्हणूनही महाराष्ट्राची ओळख आहे. महाराष्ट्राला प्राचीन मंदिरे, लेण्या आणि शिल्पे यांचाही वारसा लाभला आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी विकसित केलेले 300 किल्ले हा महाराष्ट्राचा समृद्ध ठेवा आहे. देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 ज्योतिर्लिंगे एकट्या महाराष्ट्रातच आहेत. गेल्या सहाशे वर्षात वारकरी संप्रदायाने देशपातळीवर महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण केली असून आळंदी, पंढरपूर ही तीर्थक्षेत्रे आणि अष्टविनायक परिक्रमा हे महाराष्ट्राच्या सामाजिक/अध्यात्मिक जीवनाचा प्राण आहेत. त्याबरोबरच महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी, महालक्ष्मी, रेणुकामाता व सप्तश्रृंगी ही आद्य मातृदेवतांची साडेतीन शक्तीपीठे महाराष्ट्रातच आहेत.

हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत राबविण्यात येईल. त्यासाठी 2021-22 च्या अर्थसंकल्पात 101 कोटीची तरतुद करण्यात येईल. या प्रकल्पाचे स्वरुप काय असावे, प्राधान्याने कोणती कामे हातात घ्यावी, या कामांचा तपशिल कसा असावा हे ठरविण्यासाठी प्रथमत: शासन स्तरावर समिती नेमण्यास मान्यता देण्यात आली. या समितीमध्ये प्रस्तावित सदस्य धर्मादाय आयुक्त यांचे ऐवजी प्रधान सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग यांचा समावेश करण्यात आला.

त्यानुसार या समितीची रचना खालीलप्रमाणे राहील.-

  • अप्पर मुख्य सचिव, सा.बां.विभाग- अध्यक्ष
  •  प्रधान सचिव/सचिव (व्यय), वित्त विभाग- सदस्य
  • सचिव (बांधकामे), सा.बां. विभाग- सदस्य सचिव
  • संचालक, पुरातत्व विभाग- सदस्य
  • अधिष्ठाता, सर जे.जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर- सदस्य
  • प्रधान सचिव, सांस्कृतीक कार्य विभाग- सदस्य
  • उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ- सदस्य
  • प्रधान सचिव, पर्यटन विभाग- विशेष निमंत्रित
  • प्रधान सचिव, पर्यावरण विभाग-विशेष निमंत्रित

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER