ओबीसी आरक्षणावर महाविकास आघाडी सरकार लवकरच तोडगा काढेल – नवाब मलिक

Nawab Malik

मुंबई :- ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर आले आहेत. राज्यभरातील ओबीसी नेत्यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्य सरकारने ओबीसींना आरक्षण मिळावं म्हणून जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

कोर्टाच्या आदेशाचा अभ्यास करून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार ओबीसी आरक्षणावर लवकरच तोडगा काढेल. कोर्टाच्या आदेशाचा अभ्यास केल्यानंतर ज्या काही प्रक्रिया करणे गरजेच्या आहेत त्या पूर्ण करून पुढे जाऊ, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिले आहे. नवाब मलिक यांनी माध्यमांशी चर्चा करताना ओबीसी आरक्षणाबाबतची महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळली आहे.

मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल ओबीसी घटकांचा इतर आरक्षणासोबत राजकीय आरक्षण राहिले पाहिजे या मताशी राष्ट्रवादी आणि मी व्यक्तिशः सहमत आहे, असे मलिक यांनी स्पष्ट केलं. सुप्रीम कोर्टाने आयोग स्थापन करून ओबीसींची जनगणना झाली पाहिजे असे स्पष्ट केले आहे. शिवाय देशातील ओबीसी समाजाची जनगणना झाली पाहिजे अशी मागणीही करण्यात आली आहे.

जर ही जनगणना झाली तर देशात, राज्यात आणि जिल्हानिहाय किती संख्या आहे याची खरी माहिती मिळू शकते आणि पुढचा निर्णय घेता येऊ शकतो. मात्र आता सर्व कायदेशीर बाबी तपासून उचित निर्णय राज्य सरकार घेईल असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या राज्यात मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य झाल्यावर ओबीसींच्या आरक्षणाला सुरुवात करणारे महाराष्ट्र राज्य पहिले ठरले होते. तसेच फेरनिर्णय घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हेच होते, याची आठवणही मलिक यांनी यावेळी आवर्जून करून दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button