महाविकास आघाडी सरकार स्थिर आणि टिकणारे – सुप्रिया सुळे

Supriya Sule

मुंबई : ‘राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे तीनचाकी रिक्षा आहे. हे सरकार कुणी पाडण्याची गरज नाही, ते अंतर्गत कलहातूनच पडेल.’ अशा प्रकारची विधाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपचे राज्यातील सर्वच प्रमुख नेते करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपला सणसणीत टोला लगावला आहे.

जे लोक सारखं सरकार पडणार म्हणतात ते ऐकताना मला गंमत वाटते. जी भांडी मोकळी असतात ती खूप आवाज करतात. भरलेलं भांडं कधी आवाज करत नाही, असा टोला सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना लगावला आहे. आयुष्यभर सत्तेत राहण्यासाठी येथे कुणी आलेलं नाही. त्यामुळे करायचा तेवढा आवाज करा, पडलं तर बघू काय करायचं.

आयुष्यभर सत्तेत राहण्यासाठी कोणी आलेलं नाही. आज आम्ही आहोत कधी तरी त्यांची  येईल. पण ती लवकर येणार नाही, असंही त्या म्हणाल्या आहेत. इंदापुरात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा  प्रचार करताना त्या बोलत होत्या. लोक सारखं म्हणतात की हे सरकार पडणार. हे ऐकताना मला गंमत वाटते. मुळात मोकळी भांडी फार वाजतात. त्यातलाच हा प्रकार आहे. तेव्हा तुम्हाला या भांड्यांचा जितका आवाज करायचा तितका करा.

त्याने काही फरक पडणार नाही. हे सरकार स्थिर आहे आणि टिकणारे सरकार आहे, असा विश्वासही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. सुप्रिया सुळे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यावरही भाष्य केलं. नरेंद्र मोदी शनिवारी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्यासाठी येणार आहेत. यावेळी ते लसीच्या प्रगतीसंबंधी आढावा घेणार आहेत. “आपल्या सरकारला एक वर्ष होणार आणि देशाचे प्रधानमंत्री आपल्या जिल्ह्यातल्या ठिकाणी काम होत आहे हे पाहण्यासाठी येणार याच्यापेक्षा काय मोठे यश आपल्या सरकारचे असेल? कदाचित आपलं कौतुक करण्याच्या इराद्यानेच त्यांनी पुण्यात येण्यासाठी हा दिवस निवडला असेल.” असे सुप्रिया म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER