
विरोधकांसह पक्षातील नेतेही कंटाळले ऑनलाईन बैठकांना पालिका आयुक्तांची भेट घेऊन पालिकेची सभा ऑनलाईन पद्धतीनं न घेता ऑफलाईन पद्धतीनं घेण्याची मागणी.
मुंबई : राज्याची राजधानी मुंबई महापालिकेची निवडमुक नेहमीच शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची असते. गेली अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता राहिली आहे. मात्र, यंदा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi government)असतानाही मुंबई महापालिकेत शिवसेनेची कोंडी करण्यासाठी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकत्र आले आहेत.
विरोधी पक्षांच्या गटनेत्यांनी एकत्रितपणे पालिका आयुक्तांची भेट घेऊन पालिकेची सभा ऑनलाईन पद्धतीनं न घेता ऑफलाईन पद्धतीनं घेण्याची मागणी केली आहे. ऑनलाईन पद्धतीनं घेतलेल्या बैठकीत नगरसेवकांना बोलायला मिळत नसल्यामुळे विरोधी पक्षांमध्ये नाराजी होती. विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या प्रमुख उपस्थितीत गटनेत्यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल ची भेट घेतली.
कोरोनामुळे संपुर्ण राज्याचा कारभारच ऑनलाईन पद्धतीने होत होता. मात्र, आता राज्यात अनलॉक प्रक्रिया सुरू असताना अनेकजण या ऑनलाईनला कंटाळले आहेत. कोरोनामुळे पालिकेच्या संभा ऑनलाईल घेण्यात येत आहेत मात्र ऑनलाईन सभांमध्ये बोलायला मिळत नसल्यामुळे विरोधी पक्षांचे नगरसेवक नाराज आहेत. महापालिका आयुक्तांकडे नाराजी मांडण्यासाठी आणि ऑफलाईन पद्धतीनं, कोरोनापूर्वी होत असलेल्या पद्धतीनं पालिकेच्या सभागृहात सभेचे आयोजन व्हावं, अशी मागणी विरोधी पक्षांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
कोरोना काळातील खर्चावरुन सेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न
कोरोना काळात मुंबई महापालिकेने 1600 कोटी खर्च केले आहेत. सत्ताधारी शिवसेनेने आणखी 400 कोटी खर्च करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. पालिकेच्या सभा सभागृहात घेतल्यास विरोधी पक्षांकडून कोंडीत पकडलं जाण्याची भीती असल्याने शिवसेना सभागृहात सभा घेत नाही, असा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला आहे. सर्व विरोधकांनी एकत्र येत पालिका सभागृहात ऑफलाईन पद्धतीनं सभा घेण्याची मागणी केलीय. या मागणीनुसार सभा झाल्यास विरोधकांकडून सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडलं जाण्याची शक्यता आहे. कोविड काळातील खर्चाबाबत विरोधकांचा सत्ताधारी शिवसेनेवर रोष आहे.
ऑक्टोबरपासून स्थायी समिती आणि इतर समित्यांच्या बैठका ऑफलाईन पद्धतीनं होत आहेत. त्या बैठकांमध्ये पत्रकारांना प्रवेश देण्याची मागणी केली, असल्याचं विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले. महापालिकेची सभा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यासाठी आणि पत्रकारांना सभेला प्रवेश देण्याबाबत महापालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं रवी राजा यांनी सांगितले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला