आमच्या सरकारने दिलेले मराठा आरक्षण ठाकरे सरकारला टिकवता आले नाही : देवेंद्र फडणवीस

Uddhav Thackeray-Devendra Fadnavis

मुंबई :  मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) सर्वोच्च न्यायालयाने (SC) स्थगिती दिल्याने मी व्यथित आहे. मराठा समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्नांची शर्थ करू, अशी प्रतिक्रिया भाजप (BJP) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर एका निवेदनातून देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मराठा आरक्षणावर मा. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे गेल्या कालखंडात या समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी केलेल्या आमच्या सरकारच्या प्रयत्नांवर पाणी फेरल्या गेले आहे.

सर्वांना विश्वासात घेऊन या सरकारने योग्य कारवाई केली असती तर या सरकारला आरक्षण कायम राखता आले असते; पण हे सरकार प्रारंभीपासूनच आरक्षणाच्या प्रश्नात गंभीर नव्हते आणि आज त्याचा परिणाम आपल्यासमोर आहे.” असा निशाणा त्यांनी आघाडी सरकारवर (Mahavikas Aaghadi) साधला. आमच्या सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दिवस-रात्र एक करून परिश्रम घेतले .

केवळ विधिमंडळात कायदे करून ते टिकविता आले नसते, हे लक्षात घेऊन राज्य मागासवर्ग आयोग गठित  केला. आरक्षणाच्या संपूर्ण राज्यभर झालेल्या लढ्याला कायदेशीर आधार दिला. प्रकरण उच्च न्यायालयात गेले तेव्हा तेथे प्रयत्नांची शर्थ करून ते आरक्षण टिकविले. आज मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आपण व्यथित झालो आहोत. राज्य सरकारने दाखविलेल्या बेपर्वाईचा, असंवेदनशील हाताळणीचा हा परिपाक आहे.

प्रारंभीपासूनच न्यायालयीन प्रत्येक बाबतीत या सरकारने दुर्लक्ष केले. कधी वकील हजर झाले नाही, तर कधी वेळेत आवश्यक परिपूर्ती केली गेली नाही. मागासवर्ग आयोग सात महिन्यांपासून गठित केलेला नाही. यासाठी आपण पत्रव्यवहारसुद्धा केला; पण सरकारने त्यालाही दाद दिली नाही. असे असले तरी मराठा समाजाच्या प्रत्येक लढ्यात आपण त्यांच्यासोबत आहोत. समाजाच्या उन्नतीसाठी आपण प्रयत्नांची शर्थ करू. या लढ्यात ते एकटे नाहीत. आम्ही सारे आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टी त्यांच्यासोबत आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : मराठा आरक्षणाकडे ना उद्धव ठाकरेंनी लक्ष दिलं ना शरद पवारांनी – चंद्रकांत पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER