एकनाथ खडसेंना मंत्रिपद नाही? मंत्रिपद देण्यावरून शिवसेना-राष्ट्रवादीत धुसफूस

Eknath Khadse-Mahavikas Aghadi.jpg

मुंबई : भाजपाला रामराम ठोकून जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) अवघा काही तासात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार आहेत. मात्र खडसेंना पुनर्वसन करणार कसं? असा प्रश्न आता राष्ट्रवादीसमोर उभा ठाकला आहे. एकनाथ खडसेंना कृषिमंत्रीपद देण्यात येईल अशी चर्चा सध्या सुरू आहे. परंतु शिवसेना कृषिमंत्रिपद सोडण्यास तयार नाही अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससमोर आता खडसेंच्या पुनर्वसनाचं आव्हान असणार आहे.

सध्याच्या घडीला एकनाथ खडसे यांना मंत्रिपद देणं शक्य नसलं तर नियोजन मंडळाचं कार्यकारी अध्यक्ष पद एकनाथ खडसेंना दिलं जाऊ शकतं, या पदाला कॅबिनेट दर्जा आहे. नियोजन मंडळाचं पद देऊन एकनाथ खडसेंना ताकद देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून होऊ शकतो. टीव्ही-९ मराठीने अशाप्रकारे दावा केला आहे. एकनाथ खडसे यांचे शिवसेनेसोबत चांगले संबंध नाहीत, त्यामुळे खडसेंसाठी ग्रामीण भागाशी कनेक्ट असलेले कृषी खातं का सोडायचं? असा प्रश्न शिवसेनेत निर्माण झाला आहे.

अशात शिवसेना आणि एकनाथ खडसे यांचा जुना वाद सगळ्यांनाच माहित आहेत. त्यामुळे आपला इगो आणि नाराजी बाजूला ठेवत शिवसेना खडसेंना पद देणार का असा सवाल राजकीय विश्लेशक संजय भोकरे यांनी उपस्थित केला आहे. यात दादा भुसे खडसेंसाठी पद सोडण्यासाठी तयार असल्याची चिन्ह आहेत. कारण पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे असं दादा भुसे म्हणाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे असंही संजय भोकरे म्हणाले.

तर दुसरीकडे, शिवसेनेने कृषी खातं सोडलं नाही तर गृहनिर्माण खाते एकनाथ खडसेंना दिले जाईल असंही सांगितलं जात आहे. परंतु जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण खाते सोडण्यास अनुकूल नाहीत. त्यामुळे तुर्तास एकनाथ खडसेंना ताकदीचं पद देण्याबाबत प्रतिक्षा केली जाईल, विरोधी पक्ष भाजपाला रोखण्यासाठी एकनाथ खडसेंचा वापर राष्ट्रवादीकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे खुद्द शरद पवार शिवसेनेला खातेबदल करण्यास तयार करतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER