वीज बिल सवलतीवरून महाविकास आघाडीत नाराजी; काँग्रेसला मिळत नाही अपेक्षित निधी

Mahavikas aaghadi

मुंबई : वीज बिल सवलतीच्या वादावरून महाविकास आघाडीत (MVA) नाराजी असल्याचे उघड झाले. काँग्रेसच्या मंत्र्यांना अपेक्षित निधी मिळत नाही, अशी भावना काँग्रेस मंत्र्यांमध्ये आहे. ऊर्जा खात्याने वीज बिलात सवलत मिळावी म्हणून आठ वेळा प्रस्ताव पाठवला, अशी कबुली खुद्द ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिली. पण, त्या प्रस्तावाबाबत अर्थ खात्याकडून प्रतिसाद मिळाला नाही, असे त्यांनी सांगितले.

आदिवासी विभागालादेखील अपेक्षित निधी मिळत नसल्याची तक्रार आहे. एकूण आघाडीत काँग्रेसला सापत्न वागणूक मिळत असल्याची चर्चा आहे. राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलात दिलासा मिळणार नाही, मीटर रीडिंगप्रमाणे आलेली बिले ग्राहकांनी भरलीच पाहिजेत, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी महावितरणने वीज बिल वसुलीबाबत आदेश काढले होते, त्यावर बोलताना ऊर्जामंत्र्यांनी ही माहिती दिली.

त्यामुळे वीज बिल सवलतीबाबत राज्य सरकारने यू-टर्न घेतला आहे. या मुद्द्यावरून आता महाविकास आघाडीत नाराजी असल्याचे दिसले. शिक्षण विभागात ज्या शाळा १०० टक्के विना अनुदानित आहेत, त्यांना सरसकट २० % अनुदान देण्याचा निर्णय घेतला. तर ज्या शाळांना २० % अनुदान होते  त्यांना अजून २० % अनुदान देऊन एकूण ४० % अनुदान देण्याचा निर्णय झाला. पण निधी देण्यात आला नाही. हे खाते काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याकडे आहे. त्याच वेळी दिवाळीच्या तोंडावर एस. टी. कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी हजार कोटींचे पॅकेज एस. टी. महामंडळाला देण्यात आले आहे. कारण, परिवहन खाते  शिवसेनेच्या अनिल परब यांच्याकडे आहे. काँग्रेसच्या नेत्यांच्या खात्यासंदर्भातील निर्णयाबाबत आर्थिक तरतूद होत नाही, अशी काँग्रेसच्या मंत्र्यांची भावना आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER