आघाडीत पुन्हा बिघाडी : शिवसेना-राष्ट्रवादीच्या बॅनरवरून काँग्रेस नेते नाराज

Mahavikas-Aghadi-1

ठाणे : एकीकडे भाजपाला (BJP) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना (Shivsena), राष्टवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारची स्थापना केली. या सरकारमध्ये तीन पक्षांचा सत्तेत वाटा आहे. तीन पक्षांची आघाडी मजबूत असल्याचा दावा केला जातो. हे जरी खरं असलं तरी दुसरीकडे ठाण्यामध्ये एका बॅनरवर केवळ दोनच पक्षातील नेत्यांचे फोटो लावल्याने एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

नुकत्याच झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत मुंबई सोडून एम एम आर क्षेत्रात असलेल्या ८ महानगरपालिका आणि ७ नगरपालिका मधील नागरिकांचे विनामूल्य घरात राहण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निर्णय घेण्यात आला. येण्यासाठी आभार व्यक्त करणारा एक बॅनर स्लम डेव्हलपर्स आणि आर्किटेक्ट असोसिएशनने तीन हात नाक्यावर लावलाय. या बॅनरवर “ठाकरे सरकारची वचनपूर्ती” असे म्हणत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो लावला आहे. याच बॅनर वर स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. आनंद दिघे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा देखील फोटो लावण्यात आलेला आहे. आणि याच मुद्द्यावरून काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी संताप व्यक्त करत नाराजी बोलून दाखवली.

 

ठाणे शहराच्या विकासाच्यादृष्टीने घेतलेल्या निर्णयांच्या पोस्टर, बॅनरवर सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांचेही मोठे फोटो लावणे आम्हाला अपेक्षित आहे. पण शिवसेना, राष्ट्रवादी लावत असलेल्या पोस्टर, बॅनरवर फक्त पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचेच फोटो असतात. काँग्रेस नेत्यांचे फोटो लावले जात नसल्याबद्दल ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना नाराजी व्यक्त केली.

शहरात पोस्टर, बॅनर, कटआऊटची स्पर्धा सुरू आहे. त्या विषयी पत्रकारांनी चव्हाण यांना बोलते केले असता, त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादी या मित्रपक्षांवर टीका केली. राज्याच्या सत्तेतील या तिन्ही पक्षांच्या सहमतीने कॅबिनेटमध्ये निर्णय घेतले जातात. दरम्यान, राज्याच्या सत्तेतील या तिन्ही पक्षांमध्ये शहरात सुरू असलेल्या पोस्टर, बॅनरच्या स्पर्धेवरून आता वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER