महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणीकरणास सुरवात

२४२ सभासदांची प्राथमिक यादी शासनाने केली प्रसिध्द

Aurangabad

औरंगाबाद : महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणीकरणास औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड (बु) येथून सोमवार (दि. २४) सुरवात करण्यात आली. योजनेतील लाभार्थ्यांची प्राथमिक यादी पाचोड येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजूनाना भूमरे यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आली.

सरकारविरोधात घोषणा देत भाजपचे धरणे आंदोलन

आधार प्रमाणीकरण करून सोप्या, सुटसुटीत अशा पद्धतीने पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे लाभ मिळाल्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होत असल्याचे जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी सांगितले.

या योजनेत पाचोड (बु) मधील ग्रामीण बँक, राष्ट्रीयकृत बँक, बँक ऑफ बडोदा, जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या २४२ सभासदांची प्राथमिक यादी शासनाने त्या-त्या बँकांच्या स्तरावर प्रसिद्ध केलेली आहे. त्यापैकी ५५ सभासदांचे आधार प्रमाणीकरण यशस्वी झाले आहे. सिल्लोड गावातील ५८२ लाभार्थी शेतकऱ्यांच्या ८९९ खात्यांपैकी १८० खात्यांचे आधार प्रमाणीकरण यशस्वीरित्या पुर्ण झाले असून उर्वरित आधार प्रमाणीकरण करण्याचे काम औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आणि आपले सरकार सेवा केंद्रावर सुरू आहे.

जिल्ह्यात या योजनेमध्ये एकुण २ लाख २४ हजार ८८३ एवढे लाभार्थी आहेत. त्यापैकी २ लाख २३ हजार ५६६ लाभार्थ्यांचे आधार जोडणी झालेली असून १ हजार २७७ लाभार्थ्यांचे आधार जोडणी प्रक्रिया बॅंकांमार्फत तसेच क्षेत्रीय अधिकारी यांच्याद्वारा संबंधितांशी संपर्क साधून लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.