स्वदेशी बनावटीचं ‘वस्त्र’ महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी ‘शस्त्र’ म्हणून वापरलं होतं !

Mahatma Gandhi - Maharastra Today
Mahatma Gandhi - Maharastra Today

भारतात जेव्हा संस्कृती उदयास आली तेव्हापासून खादीचा वापर होतो आहे. स्वातंत्र्याच्या लढाईत गांधींनी ग्रामीण भागाला स्वावलंबी बनवण्यासाठी, खेड्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी खादी उद्योगाला चालना देण्याचा प्रयत्न केला. या प्रकारे खादी स्वदेशी आंदोलनाचा अविभाज्य घटक बनली. गेल्या सत्तर वर्षांनंतरही खादीला असणारं महत्त्व तसूभरही कमी झालेलं नाही.

खादी हा शब्द ‘खद्दार’पासून घेण्यात आलाय. पाकिस्तान आणि बांग्लादेशात हातांनी बनवलेल्या कपड्याच्या उल्लेखासाठी हा शब्द वापरत. खादीचे कपडे सुती, रेशीम  अथवा लोकरीचे बनलेले असू शकतात.

इतिहास

भारतात हातांनी धाग्यांची छाटणी करून विणकाम करण्याची कला कित्येक शतकांपासून सुरू आहे. सिंधू संस्कृतीपासून याचे पुरावे मिळतात. प्राचीन काळात खादी वापरली जात होती, याचे अनेक पुरातत्त्वीय पुरावे उपलब्ध आहेत. मोहनजोदाडोमधल्या पुजाऱ्याच्या मूर्तीमध्ये त्यानं खादी कपडे घातले होते हे स्पष्ट दिसतं. शिवाय सिंध प्रांतात, गुजरात आणि राजस्थानमध्ये आजही खादीचा उपयोग होत असल्याचा पुरावा देणारे अनेक पुरातत्त्वीय अवशेष मिळाले आहेत.

खादी वापराचे अनेक उल्लेख इतिहासात आहेत. सिंकदरानं जेव्हा भारतावर स्वारी केली, तेव्हा त्याला मुद्रित आणि चित्रित कपडे आढळले. त्यानं व्यापाऱ्यांच्या मदतीनं हे कापड युरोपात नेलं. आशिया आणि युरोपच्या कानाकोपऱ्यात खादी पोहचवण्याचं श्रेय इतिहासानं सिंकदराच्या पारड्यात टाकलंय.

मध्ययुगीन इतिहासात भारतात हातावर विणकाम करून बनलेल्या मखमली कपड्यानं संपूर्ण जगात आपली ओळख निर्माण केली होती. शाही घराण्यांची ओळख म्हणून मखमली कापड प्रसिद्ध होतं. आशिया आणि युरोपातील सर्वच राजघराणी भारतात बनलेलं मखमली कापड वापरायचे.

मुघलांच्या काळातही खादी नावारूपाला आली. मुघलांनीच कपड्यांवर पहिल्यांदा रंगीत धाग्यांच्या विणकामाला सुरुवात केली. आज या विणकामाचे पाश्नी, बखिया, खताओ, गिट्टी, जंगीरा अशी अनेक रूपे पाहायला मिळतात.

सतराव्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय सुती कपड्यांच्या व्यवसायाचा विस्तार युरोपात मोठ्या प्रमाणात होत होता. इंग्रजांनी स्वार्थासाठी हा व्यापार संपवला. स्वतःचा माल विकण्यासाठी युरोपात भारतीय कापड विक्रीला बंदी घातली. नंतर इंग्रजांनी भारत ताब्यात घेतला. भरभराटीला आलेला कापड व्यवसाय बंद पाडणं हेच इंग्रजांचं प्राधान्यक्रमाचं काम ठरलं.

१९१५ साली गांधी आफ्रिकेतून भारतात परतले. तेव्हा इंग्रजांचा कापड व्यवसाय सर्वोच्च शिखरावर होता हे त्यांनी पाहिलं. स्थानिक व्यवसाय संपुष्टात आला होता. गांधींनी या विरुद्ध लढा देण्यासाठी स्वदेशी वापराचा मुद्दा उचलला.

वस्त्राचा उपयोग शस्त्र म्हणून

गांधींनी खादीच्या वस्त्रांचा उपयोग इंग्रजांविरुद्ध लढा देण्यासाठी शस्त्र म्हणून केला. अहिंसेच्या तत्त्वावर चालणाऱ्या गांधींसाठी ‘स्वदेशी आंदोलन’ ही निखराची लढाई होती. ज्यात खादीची भूमिका निर्णायक होती. गांधींनी खेडोपाड्यांना स्वालंबी करण्यासाठी खादीचा मार्ग अवलंबला. जातीपातीची बंधनं झुगारून भारतीयांनी गांधींच्या खादी आंदोलनाला साथ दिली. खादी अल्पावधीतच स्वदेशी आंदोलनाचे प्रतीक बनली.

यानंतर १९२५ साली असहकार आंदोलनानंतर ‘ऑल इंडिया स्पिनर्स असोसिएशन’ची स्थापना गांधींनी केली. खादी व्यवसाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी सर्व ते प्रयत्न केले. विणकाम करणाऱ्यांची आर्थिक दशा सुधारण्यासाठी या संघटनेनं भरीव कामगिरी केली.

स्वातंत्र्यानंतर

स्वातंत्र्यानंतर ‘खादी आणि ग्रामोद्योग आयोग’ स्थापन करण्यात आला. यात ग्रामोद्योग आयोग १९५६ नुसार  भारत सरकारनं याचं रूपांतर वैधानिक संस्थेत केलं.

या संस्थेचा उद्देश ग्रामीण भागातील खादी आणि त्यावर आधारित व्यवसायांना प्रोत्साहन देणं, योजनेचा प्रचार-प्रसार करणं, सुविधा आणि साहाय्यता प्रदान करणं इत्यादी आहे. या संस्थेचं मुख्यालय मुंबईत आहे. दिल्ली, भोपाळ, बंगळुरू, कोलकाता, मुंबई, गुवाहटी या भागांत  उपकेंद्रे आहेत.

नव्वदच्या दशकानंतर बदललं चित्र

नव्वदचं  दशक उजाडेपर्यंत खादीनं फॅशनचं रूप घेतलं. १९८९मध्ये मुंबईत पहिल्यांदा ‘के.व्ही.आय.ई.सी’च्या माध्यमातून पहिला खादी फॅशन शो आयोजित करण्यात आला. यात ८० हून अधिक खादी वस्त्रांना प्रदर्शित करण्यात आलं. यामुळं फॅशन क्षेत्रात खादीनं वेगळी ओळख बनवली.

यानंतर खादीचा आलेख वरतीच चढत गेला. खादी कापड पूर्णपणे नैसर्गिक असतं. त्यामुळं त्वचेला कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खादी कपडे अंगाला थंड राहतात तर थंडीच्या दिवसांत शरीराला ऊब देण्याचं काम खादी कपडे करत असतात.

जागतिकीकरणाचा मोठा फटका खादी उद्योगाला बसलाय. खादी उद्योगांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. खादी व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक संकटांना समोरं जावं लागतंय. खादी भारतीयांसाठी गर्व आणि सन्मानाचा विषय आहे. आधुनिकतेच्या प्रयत्नात आपण इतिहास आणि संस्कृतीशी जोडलेल्या खादीला विसरून जाऊ नये, अशी आशा व्यक्त केली जाते.

ही बातमी पण वाचा : महात्मा गांधींना सुभाष बाबूंना कच्चा कांदा आणि लसूण खाण्याचा दिला होता…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button