कोल्हापुरात महाशिवरात्रीची लगबग

Mahashivratri

कोल्हापूर : प्राचीन शिवालयांचे शहर असलेल्या कोल्हापूर शहरात आज (दि. 21) होणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील अनेक मंदिरांत दरवर्षी महाशिवरात्री अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी होत आहे. सर्वत्र शिवरात्रीची लगबग आहे. तर बाजारपेठेत बेल, फुले खरेदीसाठी गर्दी झाली आहे.

शहरातील सर्व शिवालये रोषणाईने उजळली आहेत. शिवमंदिरांतून रंगरंगोटी, फुलांची सजावट, केळीचे खांब लावून मंदिर सजवण्यात आले आहेत. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरांमध्ये रुद्रपठण, महारुद्राभिषेक, महापूजा आदींचे आयोजन करण्यात आले आहे. अंबाबाई मंदिर परिसरात असलेल्या अतिबलेश्वर, काशी विश्वेश्वर, मातृलिंग महादेवाच्या दर्शनासाठी दरवाजे खुले ठेवण्यात आले आहेत.

कपिलतीर्थसह उत्तरेश्वर, रावणेश्वर, चंद्रेश्वर, वटेश्वर, कैलासगडची स्वारी, लक्षतीर्थ, कोटितीर्थ, सोमेश्वर, बाळेश्वर, चंद्रेश्वर, स्टँड परिसरातील वटेश्वर, उत्तरेश्वर, ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरांतही महाशिवरात्री उत्साहात साजरी होते. या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी आहे. अनेक ठिकाणांच्या मंदिरांच्या आवारात पूजा साहित्याची दुकाने उभारली आहेत. फूल बाजारातही सकाळपासूनच बेल खरेदीसाठी गर्दी झाली होती. महाशिवरात्रीमुळे फूल बाजारात बेल आणि पांढऱ्या फुलांची आवक झाली आहे. महाशिवरात्रीनिमित्त कोल्हापूर शहराचे वातावरण भक्तिमय झाले असून करवीर वासिनी शिवपुजे दंग आहेत.