राम मंदिर निधी संकलनासाठी होणार महासंपर्क अभियान हे करणार १५ जानेवारीपासून

Ram Temple Fundraising

अयोध्येत प्रभू श्री रामाच्या भव्य मंदिराची उभारणी होणार आहे. त्यासाठी देशाच्या कानाकोपºयातून निधी संकलन करण्यात येणार आहे. आसेतुहिमाचल हे अभियान १५ जानेवारीपासून राबविले जाणार आहे. महाराष्ट्रातही त्याच दिवशी अभियानाचा प्रारंभ होईल. राम मंदिर न्यासांतर्गत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रच्या वतीने या मंदिराची उभारणी केली जाणार आहे. या देशातील सामान्यातील सामान्य माणसाचे योगदान राममंदिरासाठी असावे या हेतूने हे अभियान राबविले जाईल. दक्षिणेतील एका अत्यंत श्रीमंत मंदिर ट्रस्टने राम मंदिर स्वखर्चाने बांधण्याची तयारी दर्शविली होती. त्यासाठी चार-पाचशे कोटी रुपये खर्च करण्याची तयारीही दर्शविली होती पण राम मंदिर न्यासाने त्यास नम्रपणे नकार दिला.

अयोध्येतील राम मंदिर हे राष्ट्रीय स्मारक व्हावे अशी न्यासाची इच्छा आहे. जातपात, धर्म, राजकीय विचारसरणीच्या पलिकडे जावून प्रभू रामाचे हे मंदिर उभारले जावे असे न्यासाला वाटते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील जवळपास ४० संघटना या निधी संकलनासाठी अत्यंत सक्रिय सहभाग देणार आहेत. हे करताना कोण्या एका राजकीय पक्षाला त्याचे क्रेडिट जावू नये, हा देशातील प्रत्येक अन् प्रत्येक नागरिकाच्या सहभागाचा विषय व्हावा आणि त्या निमित्ताने प्रभू राम हे कोण्या जातपंथाचे नव्हे तर भारतीयांच्या श्रद्धेचे प्रतीक असल्याचे जगाने अनुभवावे असा व्यापक हेतू समोर ठेवण्यात आला आहे.

प्रत्येक लहान लहान गावापासून मोठ्या शहरांपर्यंत निधी संकलनाची अत्यंत पारदर्शक व्यवस्था उभी केली जात आहे. १० रुपयांपासूनची रक्कम स्वीकारली जाणार आहे. देशभरातील चार लाख स्वयंसेवक घरोघरी जावून हा निधी गोळा करतील. तालुका, नगरांमध्ये कार्यालये उघडली जात आहेत. त्या ठिकाणी निधी संकलनाचा हिशेब दरदिवशी केला जाईल. २ हजार रुपये वा त्यापेक्षा अधिक निधीचे संकलन हे १५ जानेवारी ते ३० जानेवारीपर्यंत करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यानंतर इतर निधी गोळा करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. एनईएफटी, आरटीजीएससह ई-बँकिंगद्वारेही आपल्याला राम मंदिरासाठी आर्थिक योगदान देता येईल. १० रुपयांपासून प्रत्येक निधीसाठी पोचपावती दिली जाणार आहे. दलित, आदिवासींच्या वाड्यावस्त्यांवर जाऊन या मंदिरासाठी आर्थिक योगदान घेतले जाईल. कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला त्यात योगदान देता येईल. एक महिनाभर संपूर्ण देश रामभक्तीचा अनोखा साक्षात्कार या निमित्ताने अनुभवणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या गेल्यावर्षीच्या निकालानंतर अयोध्येतील राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला होता. मंदिरांच्या उभारणीसाठी ज्यांचे घराणे प्रसिद्ध आहे असे आर्किटेक्ट चंद्रकांत सोमपुरा यांनी या मंदिराचे डिझाईन तयार केले आहे. यावर्षी ५ आॅगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले होते. मंदिराची उभारणी येत्या तीन वर्षांत करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER