महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरं निघाली, मुख्यमंत्र्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही- प्रकाश जावडेकर

Prakash Javadekar - CM Uddhav Thackeray - Maharashtra Today

मुंबई : निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) याच्या पत्रावरून राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. यावरून सत्ताधारी आणि भाजपमध्ये (BJP) आरोप-प्रत्यारोप होत असताना आता त्यात केंद्र सरकारनेही उडी घेतली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनीदेखील राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. मागील गेल्या ३० दिवसांमध्ये महाराष्ट्रात रोज इतके नवनवे खुलासे होत आहेत की त्यांचा ट्रॅक ठेवणंदेखील अवघड झालं आहे. एक तर स्पष्ट झालं की ही महाविकास आघाडी नसून महावसुली आघाडीचे सरकार आहे. यांचा किमान समान कार्यक्रम म्हणजे पोलिसांकरवी पैसा गोळा करा, लुटा हाच यांचा एकमेव कार्यक्रम सुरू आहे. इतकं महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम महावसुली आघाडी सरकारनं केलं आहे. सचिन वाझे प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरं निघाली आहेत. सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार उरलेला नाही, असा हल्लाबोल प्रकाश जावडेकर यांनी आज केला. ते नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा (CM Uddhav Thackeray) आग्रह होता म्हणून परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी त्यांना पुन्हा सेवेत घेतलं. जगात पहिल्यांदा पोलीसच बॉम्ब ठेवतात हे कुणी बघितलं नसेल. हेही महाराष्ट्रानं बघितलं आहे. पोलीसच ज्याची गाडी चोरी झाली ती घेऊन जातात आणि त्यातच बॉम्ब ठेवतात. त्यानंतर ज्याची गाडी असते त्याची हत्या करण्यात येते. हत्या कोणत्या हेतूने झाली हे तर तपासात उघड होईलच. पण मध्येच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं पत्र येतं. एका न्यायाधीशाची समिती स्थापन होते. रश्मी शुक्लांचा अहवाल येतो. मग सीबीआयची चौकशी सुरू होते. अनिल देशमुखांचा राजीनामा येतो. एनआयएचा तपास सुरूच आहे. वाझेच्या गाड्या आणि पराक्रमातून रोज नवनवे खुलासे होतात. आणि आता वाझेचं पत्र आलंय, असं प्रकाश जावडेकर यावेळी म्हणाले.

सचिन वाझे याच्या पत्रावरूनही प्रकाश जावडेकरांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. राज्याचे मुख्यमंत्री ११ मार्चला सचिन वाझेची पाठराखण करताना म्हणतात की, सचिन वाझे हा काही ओसामा बिन लादेन नाही. वाझेला अटक झाल्यानंतर १४ मार्चला संजय राऊत म्हणतात, एका सक्षम तपास अधिकाऱ्याला नाहक त्रास दिला जात आहे. शेवटपर्यंत सचिन वाझेचं समर्थन करत होते. सचिन वाझे सत्य बोलेल की काय, यासाठी त्याचं समर्थन सुरू होतं. आता सचिन वाझेचं पत्र समोर आलं आहे. या पत्रात तर गंभीर स्वरूपाचे आरोप केले गेले आहेत. गृहमंत्र्यांनी वाझेला पैसे वसूल करायला सांगितलं, पुन्हा सेवेत आल्यानंतर वाझेला काढलं जाऊ नये यासाठी दोन कोटी मागण्यात आले. अनिल परब यांनीदेखील भेडी बाजार पुनर्वसन योजनेतून ५० कोटींची वसुली करण्याची मागणी केली. पालिकेच्या कंत्राटदारांकडूनदेखील दोन कोटींची मागणी केली. ही संपूर्ण लूट सुरू होती. पण जसे अनिल परब यांच्यावर आरोप झाले, तशी संजय राऊत यांची प्रतिक्रिया बदलली, उद्धव ठाकरे शांत झाले. आता वाझे सत्य बोलू लागल्यानंतर त्याच्याविरोधात बोललं जात आहे, असा आरोप प्रकाश जावडेकर यांनी केला.

महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) हे जनतेनं निवडून दिलेलं सरकार नाही. हे सरकार फक्त वसुली करण्यासाठी सत्तेत आलं आहे. जनतेनं भाजपा आणि शिवसेना युतीला मतदान करून कौल दिला होता. पण शिवसेनेनं विश्वासघात करून विरोधी पक्षाला सोबत घेतलं आणि जनतेनं दिलेल्या मतदानाचा अपमान केला, अशी विखारी टीका जावडेकर यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button