मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० ः ही फक्त सुरुवात आहे ,उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र भरारी घेणार, मुख्यमंत्र्यांनी केला संकल्प

Uddhav Thackeray

महाराष्ट्र कोरोना (Corona) संकटातून नुसताच बाहेर पडणार नाही तर अधिक सामर्थ्याने देशात आघाडी घेतल्याशिवाय राहणार नाही

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्रीसुभाष देसाई, राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज एमआयडीसी आणि १५ कंपन्यांमध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या. या १५ कंपन्यांमार्फत जवळपास ३४ हजार ८५० कोटींची गुंतवणूक राज्यात होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत आज ‘ मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० ‘ या महत्त्वाकांक्षी योजनोसंदर्भात सह्याद्रीवर बैठक झाली. यावेळी दिलेल्या माहितीनुसार तब्बल ३४ हजार ८५० कोटींच्या गुंतवणूक करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामुळे सुमारे २३ हजार १८२ लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, असे सांगण्यात आले.

मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० बाबत बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी उद्योग विभागाकडून जी महत्त्वाकांक्षी पावले टाकण्यात येत आहेत त्याचे कौतुक केले. मला उद्योग खात्याचा अभिमान आहे, असे ते म्हणाले. उद्योग क्षेत्रात विश्वास महत्त्वाचा असतो आणि गुंतवणूकदार व राज्य शासन या दोघांचाही एकमेकांवर पूर्ण विश्वास असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मागील सामंजस्य करारातील ६० टक्के उद्योगांच्या बाबतीत सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे ही निश्चितच समाधानाची बाब आहे, असेही त्यांनी नमूद केले.

आज सुमारे ३५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार झाले आहेत. ही फक्त सुरुवात आहे. येत्या काळात राज्यात १ लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक राज्यात आणण्याचे उद्दिष्ट आहे, अशी घोषणाच मुख्यमंत्र्यांनी केली. ३५ हजार कोटींची गुंतवणूक आज होते आहे ही महत्त्वाची गोष्ट असून महाराष्ट्र कोरोना संकटातून नुसताच बाहेर पडणार नाही तर अधिक सामर्थ्याने देशात आघाडी घेतल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. कोविडनंतर आपल्यासाठी जगाचे दरवाजे उघडताहेत. ‘युनिटी इन डायव्हर्सिटी’ असा हा आजचा करार आहे. विविध क्षेत्रातील उद्योग राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. या माध्यमातून महाराष्ट्र हा डेटा सेंटरच्या बाबतीत देशाचे महत्त्वाचे केंद्र बनेल असा मला विश्वास आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER