महाराष्ट्र आपला भूभाग परत मिळविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : मुश्रीफ

Hasan Mushrif

कोल्हापूर : बेळगावसह ज्या सीमाभागाबद्दल कर्नाटकचे मंत्री वारंवार बोलतात की, हा सर्व सीमाभाग महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्र आपला भूभाग परत मिळविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा महाराष्ट्राचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी दिला आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी चंद्र-सूर्य असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहील, अशी दर्पोक्ती केली आहे. त्याचा समाचार घेताना मुश्रीफ प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महाराष्ट्र-कर्नाटक वादात महाजन आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाचे कामकाज सुरू झाले त्यावेळी महाराष्ट्र शासनाकडून काहीसे दुर्लक्ष झाले आणि गेली अनेक वर्षे हा संपूर्ण मराठी भाषिक भूभाग कर्नाटकात अडकला आहे. हा संपूर्ण भाग महाराष्ट्राचाच आहे. अनेक वर्षे सीमाभागातील मराठी भाषिक महाराष्ट्रात येण्यासाठी सनदशीर मार्गाने लढा देत आहेत, असेही मुश्रीफ म्हणाले.

महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे हे या प्रश्नासाठी समन्वयकमंत्री म्हणून काम पाहत आहेत. सर्वोच्च न्यायालयात जे काही पुरावे द्यायचे होते ते सर्व पुरावे महाराष्ट्र सरकारने दिले आहेत. हा सर्व भूभाग आम्ही महाराष्ट्रात परत घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा दिलासाही मुश्रीफ यांनी सीमावासीय बांधवांना दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER