नागपुरात एक हजार खाटांचे कोविड सेंटर उभारण्यास राज्य सरकारचा होकार

नागपूर :- महाराष्ट्र सरकारने (Maha govt) नागपुरातील मानकापूर स्टेडियममध्ये एक हजार खाटांचे कोविड केअर सेंटर (Covid care centre) सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे. या केंद्रामध्ये व्हेंटिलेटरसह ४०० बेड्स आणि ३०० ऑक्सिजनयुक्त बेड्स असतील. राज्य सरकारने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला या निर्णयाची माहिती दिली. या अगोदरच्या सुनावणीत न्यायालयाने सरकारच्या कार्यक्षमतेवर असंतोष व्यक्त करत नाराजी व्यक्त केली होती.

नागपूर महानगरपालिकेने (NMC) १९ ऑगस्ट रोजी मानकापूर स्टेडियमवर एक हजार खाटांचे रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला होता. नागपूर (Nagpur) विभागातील कोविड -१९ रुग्णांच्या उपचारासाठी पायाभूत सुविधांच्या कमतरतेबाबत याचिकांच्या सुनावणीदरम्यान, पालिकेने १५ सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला सांगितले होते की, राज्य सरकारने दिलेल्या प्रस्तावावर अद्याप निर्णय घेतला नाही. सप्टेंबर १५ च्या  आदेशात न्यायमूर्ती रवी देशपांडे आणि न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांच्या खंडपीठाने म्हटले होते की, राज्य सरकार अशा प्रस्तावावर कसा प्रतिसाद देत नाही याबद्दल आम्हाला आश्चर्य आहे. नागपुरातील परिस्थिती भयानक आहे. दिवसेंदिवस मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. शवागार भरलेले आहेत. स्मशानभूमीत रांगा लागलेल्या आहेत. रुग्णांना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनयुक्त बेड मिळत नाहीत. परिस्थिती तीव्र बनत चालली आहे. त्यानंतर खंडपीठाने राज्य सरकारला एका आठवड्यात या प्रस्तावावर योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. सरकार या प्रस्तावाचा निर्णय घेण्यास अपयशी ठरल्यास मुख्य सचिवांना वैयक्तिक  हजर होण्याचे निर्देश न्यायाधीशांनी दिले होते.

गुरुवारी खंडपीठाला सांगण्यात आले की, हा प्रस्ताव सरकारने स्वीकारला आहे. न्यायालयाने आता विभागीय आयुक्त तसेच नागपूर महानगरपालिका आयुक्तांना त्या सुविधेसंदर्भात सविस्तर आराखडा सादर करण्याचे तसेच केंद्र उभारणीचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER